ममता बॅनर्जी यांच्याकडून राज्यघटनेचा अवमान, मोदींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:09 AM2019-05-10T05:09:57+5:302019-05-10T05:10:19+5:30
मी देशाचा पंतप्रधान आहे हे मान्य करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार नाहीत. त्या राज्यघटनेचा अवमान करीत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
बंकुरा : मी देशाचा पंतप्रधान आहे हे मान्य करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार नाहीत. त्या राज्यघटनेचा अवमान करीत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी मला थप्पड मारण्याची भाषा केली होती, असा आरोप करून मोदी म्हणाले की, दीदींची थप्पड म्हणजे माझ्यासाठी आशीर्वादच असेल.
सभेत ते म्हणाले की, भारताचे पंतप्रधान म्हणून त्या मला मान्यता देत नाहीत, मात्र पाकिस्तानचे पंतप्रधानांविषयी अभिमानाने बोलतात. निवडणुकांत पराभव होण्याच्या चिंतेने ग्रासल्याने त्या राज्यघटनेचाही अवमान करत आहेत. फोनी चक्रीवादळाने धडक दिली, त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी माझे फोनही घेतले नाहीत. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीविषयी केंद्रातील अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा करायची होती. पण त्याला ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली नाही.
मोदी हे मावळते पंतप्रधान (इक्सपायरी प्राइम मिनिस्टर) असून मी नव्या पंतप्रधानांशी चर्चा करेन असे ममता एका सभेत म्हणाल्या होत्या. त्यावर मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालपेक्षा कुटुंबीय, खंडणीखोर सहकारी यांचे कोटकल्याण करण्यात ममता बॅनर्जी यांना जास्त रस आहे. त्या माझ्यावर असभ्य भाषेत टीका करत असल्या तरी त्याला मी बधणार नाही. सत्तेच्या लालसेपायी त्यांनी बंगालची पुरती वाट लावली आहे. (वृत्तसंस्था)
विधानाचा विपर्यास