काल अंत्यसंस्कार झाले, आज 'तो' जिवंत परतला; घटनेची पंचक्रोशीत चर्चा, सारेच चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 11:08 PM2022-05-06T23:08:47+5:302022-05-06T23:12:19+5:30

पत्नीनं बांगड्या फोडल्या, कुंकू पुसलं; अंत्यसंस्कारानंतर २४ तासांत पती 'जिवंत' परतला

man alive after cremation in gwalior indarpur relatives funeral living person | काल अंत्यसंस्कार झाले, आज 'तो' जिवंत परतला; घटनेची पंचक्रोशीत चर्चा, सारेच चक्रावले

काल अंत्यसंस्कार झाले, आज 'तो' जिवंत परतला; घटनेची पंचक्रोशीत चर्चा, सारेच चक्रावले

Next

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. काल अंत्यसंस्कार झालेला तरुण आज जिवंत परतल्यानं साऱ्यांनाच धक्का बसला. बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन गृहातून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र दुसऱ्या दिवशी मुलगा जिवंत असल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाला घरी आणलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे आता पोलीस मुलाच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार नेमके कोणाच्या मृतदेहावर केले याचा शोध घेत आहेत.

इंदरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगजा रोड परिसरात वास्तव्यास असलेला जुगल किशोर सिंह त्याच्या घरातून गायब झाला. ग्वाल्हेरच्या महाराजवाड्याजवळ असलेल्या एका बागेत तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. जुगलला अर्धांगवायूचा झटका येऊन गेला असल्यानं त्याच्या शरीराचा निम्मा भाग अधू झाला आहे. त्यातच बागेत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणालादेखील अर्धांगवायूचा झटका येऊन गेलेला होता. मृतदेह आमच्याच मुलाचा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. त्यामुळे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी कुटुंबाला सोपवला. त्यानंतर जुगलच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

अंत्यसंस्काराचे विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जुगलचे कुटुंबीय स्मशानात अन्य विधी करण्यासाठी जात होते. ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, तो मृतदेह आपल्या मुलाचा नव्हता, अशी माहिती त्यावेळी त्यांना समजली. आपला मुलगा गिरवाई परिसरातील दुकानात बसला असल्याचं त्यांना समजलं. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलीस नौगाजा रोड परिसरात पोहोचले. जुगलच्या कुटुंबीयांना घेऊन ते गिरवाईला पोहोचले. तिथे जुगल एका दुकानाबाहेर बसलेला दिसला. जुगलच्या कुटुंबीयांना आपला मुलगा समजून कोणावर अंत्यसंस्कार केले, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. 
 

Web Title: man alive after cremation in gwalior indarpur relatives funeral living person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.