...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 04:09 PM2024-05-20T16:09:59+5:302024-05-20T16:13:53+5:30
तरुणाच्या खात्यात 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आली. ही माहिती मिळताच खातेदारच नव्हे तर बँकेच्या मॅनेजरलाही मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. सुरियावान पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जुनपूर गावात राहणाऱ्या तरुणाच्या खात्यात 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आली. ही माहिती मिळताच खातेदारच नव्हे तर बँकेच्या मॅनेजरलाही मोठा धक्का बसला आहे. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, भानू प्रकाश याच्या केसीसी खात्यातील थकबाकीमुळे हे घडले आहे आणि सध्या खातं होल्डवर ठेवण्यात आलं आहे.
दुर्गागंजच्या अर्जुनपूर गावात राहणारा भानुप्रकाश बिंद याच सुरियावानच्या बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेत खातं आहे. गुरुवारी, 16 मे रोजी अचानक त्यांच्या खात्यात 99999495999.99 (99 अब्ज 99 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये) रक्कम येऊ लागली. एवढी मोठी रक्कम अचानक या व्यक्तीच्या खात्यात आल्याने बँक कर्मचारी चक्रावले.
बँक कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती खातेदार भानुप्रकाश बिंद याला दिली. माहिती मिळताच त्यांनी बँकेत धाव घेतली, तेथे खातेदार भानुप्रकाश याला त्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून धक्काच बसला. बँक मॅनेजर आशिष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेदार भानुप्रकाश याचे केसीसी खातं असून त्या खात्याद्वारे त्याने शेतीवर कर्ज घेतलं होतं.
खाते NPA झाल्यानंतर, अशी चुकीची रक्कम दिसून आली आणि खातं होल्डवर ठेवलं गेलं. ते म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड (KCC) लोन अकाऊंटच्या नॉन-परफॉर्मिंग एसेट (NPA) बनल्यानंतर, सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे मायनस चिन्ह दिसत नसल्यामुळे एवढी मोठी रक्कम खात्यात दिसत होती. ही चूक लक्षात येताच बँकेने तात्काळ कारवाई करत परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत.