बस हायजॅक करणाऱ्या आरोपींचा आग्र्यात एन्काऊंटर; एक जखमी, दुसरा फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:06 AM2020-08-20T10:06:41+5:302020-08-20T10:36:08+5:30
बस हायजॅक करणाऱ्या आरोपींसोबत पोलिसांची पहाटे चकमक
आग्रा: बस हायजॅक करणारे आरोपी आणि पोलीस यांच्यात आज पहाटेच्या सुमारास चकमक झाली. फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी सुरू असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. आरोपींकडून सुरू असलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. त्यात एका आरोपीच्या पायाला गोळी लागली, तर दुसरा फरार झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या आरोपीचं नाव प्रदीप गुप्ता असं आहे. बस हायजॅक प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं. पोलिसांनी प्रदीप गुप्ताला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे विभागाचं पथक गुप्ताची चौकशी करत आहे. बस हायजॅक प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
काल गुरुग्राममधून एक खासगी बस झाशीच्या मऊरानीपूर, छतरपूर, पन्नामध्ये ३४ प्रवाशांना सोडण्यासाठी निघाली. बस आग्र्याच्या दक्षिण बायपासच्या पुढे जाताच कारमधून आलेल्या काहींनी बसला ओव्हरटेक केला. बस कर्जावर घेण्यात आलेली असून त्याचे हप्ते वेळेवर भरले जात नसल्याचा दावा बसमध्ये शिरलेल्या व्यक्तींनी केला. त्यांनी बसचा चालक आणि कंडक्टरला कारमध्ये बसवलं. कारमधून आलेल्या एकानं बसचा ताबा घेतला. बसमधील प्रवाशांना याची कल्पना नव्हती. त्यांना एका ठिकाणी उतरवून दुसऱ्या गाडीनं झाशीला पाठवण्यात आलं.