भक्ताने केली अशी फसवणूक! दानपेटीत टाकला १०० कोटींचा चेक, पण इतकेच पैसे शिल्लक होते खात्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:20 PM2023-08-25T13:20:33+5:302023-08-25T13:21:46+5:30
हा चेक मंदिर प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेत पाठवला असता भक्ताच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
विशाखापट्टणम : दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणममधील सिंहाचलम टेकडीवर असलेल्या श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात (Sri Varahalakshmi Narasimha Swamy Temple) एका भक्ताने चक्क देवाची फसवणूक केली. दरम्यान, भक्ताने मंदिराच्या दानपेटीत १०० कोटी रुपयांचा चेक टाकला. हा चेक मंदिर प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेत पाठवला असता भक्ताच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
भक्ताच्या खात्यात फक्त १७ रुपये शिल्लक रक्कम होती. यानंतर या चेकचा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चेकवर बोड्डेपल्ली राधाकृष्ण नावाच्या व्यक्तीची स्वाक्षरी आढळून आली. मात्र, त्या व्यक्तीने या चेकवर कोणतीही तारीख टाकलेली नाही. दरम्यान, चेक पाहिल्यानंतर देवाची फसवणूक करणाऱ्याचे बँक खाते विशाखापट्टणम येथील कोटक महिंद्रा बँकेत असल्याचे समजते.
विशाखापट्टणमचे श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दानपेटीत चेक आढळून आल्यावर त्यांनी तो कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नेला. चेक पाहिल्यानंतरच त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेतील अधिकार्यांना देणगीदाराच्या खात्यात खरोखर १०० कोटी रुपये आहेत का? ते तपासण्यास सांगितले.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर प्रशासनाला सांगितले की, ज्या व्यक्तीने चेक जारी केला त्याच्या खात्यात फक्त १७ रुपये आहेत. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर आता मंदिर प्रशासन दानपेटीत १०० कोटींचा चेक देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बँकेची मदत घेणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, जर मंदिर अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा त्या व्यक्तीचा हेतू असेल, तर त्याच्याविरुद्ध चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेकडे अपील केले जाऊ शकते.