“ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून 'गॉड'नं माझ्यावर दया दाखवली”; गावकऱ्यांनी केला बहिष्कार
By प्रविण मरगळे | Published: January 20, 2021 03:08 PM2021-01-20T15:08:08+5:302021-01-20T15:14:13+5:30
नहतौर पोलिस ठाण्यांतर्गत हरगनपूर गावात सोमवारी पंचायत घेण्यात आली
बिजनौर – जिल्ह्यातील नहतौर भागात एका व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांचा असा आरोप आहे की, गावात अलीकडेच एक बैठक घेण्यात आली. ज्यात धार्मिक साहित्य आणि काही अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु पीडित व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारे तक्रार नोंद करण्यात आली नाही.
नहतौर पोलिस ठाण्यांतर्गत हरगनपूर गावात सोमवारी पंचायत घेण्यात आली, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ख्रिश्चन धर्माचे काही लोक परमसिंह सैनी नावाच्या व्यक्तीच्या घरी येतात, दर रविवारी त्यांच्याकडे धार्मिक विधी करत असतात. जेव्हा गावकऱ्यांनी याचा निषेध केला तेव्हा सैनीने स्वतःला ख्रिश्चन असल्याचं सांगितले, आणि त्याचसोबत माझ्या कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावर गावातील सरपंच सतीश कुमार म्हणाले, “जेव्हा परमसिंह सैनी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तेव्हा आम्ही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला की धर्म बदलणे ही चांगली गोष्ट नाही पण त्याला ते मान्य नव्हते. त्यानंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकत्रितपणे सैनीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता गावातील कोणीही सैनीच्या कुटुबाशी बोलणार नाही असं या बैठकीत ठरवलं.
दुसरीकडे परमसिंह सैनी म्हणाले, आता मी ख्रिस्ती धर्माचा अनुयायी आहे. पूर्वी मी आजारी असायचो. जेव्हा मी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा गॉडने माझ्यावर दया दाखवली, आता मी आता स्वस्थ आहे. भारतीय घटनेने मला कोणत्याही धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. काही गावक्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला आहे, ही त्यांची इच्छा आहे, परंतु माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचे मी स्वागत करीन असं सैनी म्हणाले आहेत.
तर आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पोलीस अधिकारी गावात जाऊन सैनी यांना भेटले आहेत. त्यांनी धर्मांतर केले नसल्याचे पोलिसांना सांगितले. तो काही आजाराने ग्रस्त होता. त्यानंतर तो देहरादूनमध्ये काही लोकांशी भेटला ज्यांनी त्याच्यावर उपचार केले. आता तो आजारातून मुक्त झाला आहे असं सैनी यांनी सांगितले. तसेच मी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आहे पण धर्म बदलला नाही असं सैनी यांचे म्हणणं आहे, मात्र सैनी यांनी गावकऱ्यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल केली नाही असं बिजनौर एसपी धरमवीर सिंह म्हणाले.