सिगारेट ओढता ओढता लागली झोप, 70 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 02:00 PM2018-01-29T14:00:42+5:302018-01-29T14:00:54+5:30
जयलक्ष्मीनगर येथे राहणा-या 70 वर्षीय मणी यांचा आपल्याच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. सिगारेट ओढत असताना ती संपण्याआधीच मणी यांची झोप लागली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
चेन्नई - आगीशी खेळणारे अनेकदा जळून खाक होतात...ही गोष्ट तिरुवल्लूर येथील एका वृद्धासाठी तंतोतंत खरी ठरली आहे. अर्ध्या जळालेल्या सिगारेटमुळे या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जयलक्ष्मीनगर येथे राहणा-या 70 वर्षीय मणी यांचा आपल्याच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. सिगारेट ओढत असताना ती संपण्याआधीच मणी यांची झोप लागली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
ही दुर्घटना शनिवारची आहे, जेव्हा मणी यांनी दारु प्यायल्यानंतर सिगारेट ओढण्याचं ठरवलं. बेडवर झोपलेले असतानाच मणी यांनी सिगारेट पेटवली आणि ओढण्यास सुरुवात केली. पण काही वेळ सिगारेट ओढल्यानंतर त्यांना झोप येऊ लागली. ते सिगारेट संपवण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी सिगारेट बाजूला ठेवून दिली, पण कदाचित ती योग्य ठिकाणी ठेवली गेली नाही. न विझवण्यात आलेल्या सिगारेटमुळे काही वेळानंतर रुमला आग लागली आणि सगळीकडे पसरली. दुस-या दिवशी सकाळी घरातून धूर येताना पाहिल्यावर त्यांनी धाव घेत दरवाजा उघडला.
तपास अधिका-याने सांगितलं आहे की, 'पहाटे जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास शेजा-यांनी घराच्या खिडकीतून धूर येताना पाहिला आणि त्यांचा मुलगा श्रवणन याला कळवलं'. मणी आपल्याच मुलाच्या घराजवळील एका खोलीत राहत होते. श्रवणन याने तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला आणि आगीची माहिती दिली. अग्निशमन दल वेळेत घटनास्थळावर दाखल झाले होते. जोपर्यंत आग विझवण्यात आली तोपर्यंत मणी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.