रुग्णालयात ना डॉक्टर, ना नर्स; शिपायानं दिलं रुग्णाला इंजेक्शन, अन् मग घडला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 12:58 PM2022-04-07T12:58:23+5:302022-04-07T13:02:23+5:30
रुग्णालयात एकही वैद्यकीय कर्मचारी नसल्यानं शिपायानं दिलं जखमी रुग्णाला इंजेक्शन
भिलवाडा: राजस्थानच्या भिलवाड्यातील रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी नसल्यानं एका जखमी तरुणाला शिपायानं इंजेक्शन दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील शिपाई रुग्णाला इंजेक्शन देत असल्याचं पाहून उपस्थितांना धक्काच बसला.
रुग्णालयात डॉक्टर नसल्यानं कर्मचारी वर्ग गायब होता. या प्रकरणी बीसीएमओकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. भिलवाडा येथील बडलियासमधील रुग्णालयात हा प्रकार घडला. बडलियास बरुंधनी मार्गावर धौला भाटाजवळ एका भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रेलरनं दुचाकीस्वाराला धडक दिली. हुकूम सिंह असं या तरुणाचं नाव आहे.
आसपासच्या लोकांनी हुकूम सिंहला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी हजर नव्हते. रुग्णालयात शिपाई असलेल्या शंकरलाल शर्मांनी हुकूम सिंहला इंजेक्शन दिलं. ते पाहून उपस्थितांना धक्काच बसला. रुग्णाची स्थिती गंभीर असल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.