...अन् आतडी बाहेर येऊनही तो ९ किमी चालला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:43 PM2019-07-24T17:43:14+5:302019-07-24T17:45:29+5:30
तरुणाच्या धैर्यानं सगळे अवाक्; आता प्रकृती स्थिर
वारंगल: अपघातामुळे आतडी बाहेर येऊनही एक तरुण ९ किलोमीटर चालत गेला. तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात ही अविश्वसनीय घटना घडली. अपघातात गंभीर जखमी होऊनही तब्बल ९ किलोमीटर चालत आलेल्या या तरुणाला पाहून अनेकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. मात्र तरुणानं दाखवलेल्या धैर्यामुळे त्याचा जीव वाचला. सुनील चौहान असं या तरुणाचं नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी सुनील त्याचा भाऊ प्रवीण आणि अन्य काही जणांसोबत उत्तर प्रदेशच्या बलिया भागातून संघमित्रा एक्स्प्रेसमधून आंध्र प्रदेशच्या नेल्लोरला जायला निघाला होता. मध्यरात्री २ वाजता एक्स्प्रेसनं तेलंगणाच्या हसनपर्थी भागातील उप्पल रेल्वे स्थानक सोडलं. त्यावेळी सुनील लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेला होता. शौचालयातून बाहेर आल्यावर तो काही वेळ वॉश बेसिनजवळ थांबला. यावेळी डब्याचा दरवाजा उघडा होता. त्या दरवाज्यातून सुनील खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला खाली पडताना कोणीच पाहिलं नसल्यानं एक्स्प्रेस पुढे निघून गेली.
वेगात असलेल्या एक्स्प्रेसमधून पडल्यानं सुनील गंभीर जखमी झाला. त्याची आतडी बाहेर आली. मात्र तीव्र वेदना होत असूनही सुनीलनं आतडी आत ढकलली. जखमेवर शर्ट बांधलं आणि अंधारातून रेल्वे रुळांवरुन चालू लागला. आतडी बाहेर येऊ नये म्हणून सुनीलनं जखम दाबून ठेवली आणि त्याच अवस्थेत तो ९ किलोमीटर अंतर कापून हसनपर्थी रेल्वे स्थानकात पोहोचला. स्टेशन मास्टर नवीन पंड्यांनी त्याला रेल्वे रुळांवरुन येताना पाहिलं. त्यांनी सुनीलला तातडीनं वारंगलमधील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सुनीलचा प्रकृती स्थिर आहे.