विना हेल्मेटसाठी दंड आकारला तर पठ्ठ्यानं पुरावाच मागितला, मग काय ट्राफिक पोलिसांनी अशी केली पोलखोल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 08:40 PM2022-10-21T20:40:23+5:302022-10-21T20:42:47+5:30
जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. फक्त दंड आकारला जाऊ नये म्हणून हेल्मेट वापरायचा नसतो तर तो लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे.
जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. फक्त दंड आकारला जाऊ नये म्हणून हेल्मेट वापरायचा नसतो तर तो लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास हेल्मेट तुमचा जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतं. पण असं असूनही अनेकजण दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करतात, परिणामी काहीवेळा लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. हेल्मेटशी संबंधित एक मजेदार घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही नक्कीच पोटधरून हसाल.
हेल्मेट न घातल्याने किती जणांना दंड आकारला जातो हे तुम्ही पाहिलेच असेल. छोट्या शहरांमध्ये फक्त वाहतूक पोलिसच वाहनांची तपासणी करताना दिसतात. तर दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन पद्धतीनं दंड आकारला जातो आणि त्यांच्या बँक खात्यातून दंडाची रक्कम कापली जाते. नुकतंच एक प्रकरण यासंदर्भात बंगळुरूत घडलं की ज्यात ज्या वाहनचालकावर दंड आकारण्यात आला त्यानं पोलिसांकडेच पुरावे मागितले.
त्याचं जालं असं की बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यक्तीचं ऑनलाइन चलान कापलं आणि त्यानंतर दंडाची पावती त्याच्या घरी पोहोचली. मग काय, त्यानं हेल्मेट घातलेलं नसल्याचा पुरावा वाहतूक पोलिसांकडे मागितला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @chrisfe143 नावाच्या आयडीसह ट्विटरवर यासंदर्भातील ट्विट करण्यात आलं आहे. "मी हेल्मेट घातले नव्हते याचा कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही. कृपया हेल्मेटशिवाय माझा फोटो दाखवा किंवा माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या. माझ्यासोबत यापूर्वीही असेच घडले आहे. मग मी दंड भरुन माझ्याविरोधात केस निकाली काढली होती. पण यावेळी मी असं करणार नाही", असं तक्रारदार वाहनचालकानं म्हटलं आहे.
— ಬೆಂಗಳೂರು ಸಂಚಾರ ಪೊಲೀಸ್ BengaluruTrafficPolice (@blrcitytraffic) October 19, 2022
मग काय, ट्विटला उत्तर म्हणून बंगळुरू ट्राफिक पोलिसांनी त्याचा हेल्मेटविना फोटोच शेअर केला. आता त्या व्यक्तीची पोलखोल झाली आणि त्यानं आपलं ट्विट डिलीट केलं. आता नेटिझन्स संबंधित यूझरला चांगलंच ट्रोल करत आहेत.