कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:04 PM2021-09-28T14:04:44+5:302021-09-28T14:07:09+5:30
सलून चालक झाला कोट्यधीश; कोलकाता वि. चेन्नई सामन्यात लागली लॉटरी
मधुबनी: आयपीएल सामना सुरू होण्याआधी तुमची ड्रीम टीम निवडा आणि करोडो जिंका, अशी जाहिरात आपण अनेकदा निवडतो. आयपीएलच्या सामन्याआधी आपली टीम निवडणाऱ्यांची संख्या कमी नाही. ड्रीम ११ वर टीम लावून दररोज थोडी रक्कम जिंकणारे आपण आसपास पाहतो. मात्र बिहारच्या मधुबनीमध्ये सलून चालवणाऱ्या एकाला ड्रीम ११ नं कोट्यधीश केलं आहे.
मधुबनीतल्या अंधराठाढीमधल्या ननौर चौकात सलून चालवणाऱ्या अशोक यांना ड्रीम ११ मुळे लॉटरी लागली आहे. रविवारी आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना रंगला. या सामन्याआधी ५० रुपये लावून अशोक यांनी त्यांची ११ जणांची टीम निवडली. त्यांच्या संघानं अक्षरश: कमाल केली. अशोक यांनी निवडलेल्या सर्वच्या सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली.
मोदी सरकार सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत; 'या' व्यक्तींना मिळू शकतो लाभ
मधुबनीत वास्तव्यास असलेल्या अशोक यांना यासंदर्भात कंपनीकडून अधिकृत फोनदेखील आला आहे. अशोक यांनी १ कोटी रुपये जिंकले आहेत. यातील ३० टक्के रक्कम कर म्हणून कापली जाईल आणि अशोक यांना ७० लाख रुपये मिळतील. एका गरीब कुटुंबातून येणाऱ्या अशोक यांना ड्रीम ११ वर इतके पैसे जिंकता येतील, याचा कोणी विचारदेखील केला नव्हता.
अशोक ठाकूर मूळचे मधुबनीतल्या झंझारपूरमधील अररिया संग्रामचे रहिवासी आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय साधारण आहे. ननौर चौकात त्यांचं लहानसं सलून आहे. याच जोरावर ते कुटुंबाचं पोट भरतात. १ कोटी रुपये जिंकल्याचं समजताच अशोक यांना प्रचंड आनंद झाला. याच आनंदाच्या भरात त्यांना रात्रभर झोप लागली नाही. या पैशातून कर्जाची परतफेड करणार असून एक सुंदर घर उभारणार असल्याचं अशोक यांनी सांगितलं.