बेरोजगारांसाठी अशीही भरती; पगार महिना 15 हजार, काम रोज किमान एक चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 03:06 PM2018-10-11T15:06:44+5:302018-10-11T15:08:25+5:30
महिना 15 हजार रुपये पगारावर चोरीसाठी नेमले सहा तरुण
जयपूर: एखादी कंपनी दहावी, बारावी, पदवीपर्यंतचं शिक्षण झालेल्या तरुणांना रोजगार देते, हे तुम्ही अनेकदा वाचलं असेल. कंपनीतील कामाचं स्वरुप आणि पगार या गोष्टी नोकरीची संधी स्वीकारताना महत्त्वाच्या असतात. मात्र जयपूरमध्ये एका 21 वर्षांच्या तरुणानं 6 बेरोजगारांना एका वेगळ्याच कामासाठी नोकरीला ठेवलं होतं. हा तरुण 6 जणांना महिन्याला 15 हजार पगार द्यायचा. त्या बदल्यात या तरुणांना दिवसाला एक चोरी करावी लागायची. पोलिसांनी या म्होरक्यासह त्याच्या 6 'कर्मचाऱ्यांना' अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचं सामान जप्त करण्यात आलं आहे.
जयपूरमधील एक तरुण बेरोजगारांना चोरी करण्यासाठी चक्क नोकरी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या व्यक्तीचं नाव आशीष मीणा असं आहे. त्यानं 6 जणांना नोकरीवर ठेवलं होतं. त्या 6 जणांना दिवसाला किमान एक चोरी करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना महिन्याकाठी 15 हजार रुपये इतका पगार दिला जायचा. पोलिसांनी या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून मोबाईल, सोन्याची चेन, मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी पकडलेली टोळी सर्कल एरिया, शिवदासपुरा, खो नागोरिया, सनागनेरमध्ये खूप सक्रिय होती. या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि चोरी झालेल्या फोनच्या मदतीनं पोलीस या टोळीपर्यंत पोहोचले. ही संपूर्ण टोळी प्रताप नगरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर छापा टाकून पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून 33 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 सोन्याच्या चेन, 4 मोटारसायकल जप्त केल्या. चोरी करणारे 6 तरुण सर्व सामान आशिषकडे जमा करायचे. तो या सर्व वस्तू विकून 6 तरुणांना पगार द्यायचा. या 6 तरुणांना दिवसातून एक चोरी करावीच लागायची. अन्यथा आशिष त्यांचा एक दिवसाचा पगार कापायचा.