‘मन की बात’ अशी जुळून आली....
By admin | Published: January 27, 2015 11:30 PM2015-01-27T23:30:31+5:302015-01-27T23:30:31+5:30
बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताकदिन पथसंचलन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताकदिन पथसंचलन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही विदेशी नेत्यासोबत आकाशवाणीवर(आॅल इंडिया रेडिओ)संबोधित करणारे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पटकावला आहे. मोदी आणि ओबामा यांनी संयुक्तरीत्या संबोधित केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रसारण मंगळवारी रात्री ८ वाजता झाले. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता त्याचे पुन:प्रसारण होत आहे.
ओबामा २५ जानेवारी रोजी हैदराबाद हाऊसमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत सहभागी झाल्यानंतर ‘मन की बात’ या खास कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग झाले. त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मोदी दर आठवड्याला ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेपर्यंत संदेश पोहोचवत असतात, तथापि ओबामांसोबत संयुक्तरीत्या संबोधित करण्याबाबत ते खास उत्साहित होते. मोदींच्याच आग्रहास्तव ओबामांनी व्यग्र कार्यक्रमांमधून ‘मन की बात’ साठी वेळ काढला.
संपूर्ण देशाला संबोधित करायचे झाल्यास आकाशवाणीपेक्षा दुसरा चांगला पर्याय कोणता राहणार होता?
आॅल इंडिया रेडिओसोबतच डीडी वन, डीडी न्यूज आणि दूरदर्शनवर प्रसारभारतीच्या माध्यमातून तो प्रसारित करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आणि सोशल मीडियावरही स्थान मिळाले. देशभरातील किमान ८५ कोटी लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला जावा यासाठी सरकार प्रयत्नशील होते. भारत आणि अमेरिकेच्या १०० कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला जात आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबरपासून सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाबद्दल मोदींनी सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकदा लिहिले आहे.