प्रेमासाठी कायपण; गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी 'त्याने' केलं तिच्या पुतण्याचंच अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 01:12 PM2018-04-10T13:12:37+5:302018-04-10T13:12:37+5:30
२४ तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलाची सुटका
आधी अपहरण, मग केली जाणारी पैशांची मागणी, अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र तेलंगणातील एका कुटुंबाकडे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या सुटकेसाठी एक अजब मागणी करण्यात आली. मुलगा सुखरुप हवा असेल, तर माझ्या प्रेमात आडवे येऊ नका. माझी गर्लफ्रेंड मला हवी आहे, अशी मागणी अपहरणकर्त्याने कुटुंबाकडे केली. या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने त्याच्या प्रेयसीसाठी हा संपूर्ण प्रकार केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
तेलंगणातील वानपर्ती जिल्ह्यातील कोथाकोटामधून आठ वर्षांच्या चंद्रू नायकचे ७ एप्रिल रोजी शाळेतून अपहरण झाले होते. महबूबनगरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षांच्या वामसी कृष्णने चंद्रूचे अपहरण केले. अपहरण केलेल्या चंद्रूच्या आत्येसोबत वामसीचे प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरी याबद्दलची कुणकुण लागताच त्यांनी वामसीला मारहाण केली आणि पुन्हा जवळपास दिसू नकोस, अशी धमकीदेखील दिली. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी आणि दुरावलेले प्रेम परत मिळवण्यासाठी चंद्रूचे अपहरण केले.
यानंतर वामसीने कोथाकोटा बस स्थानकातून चंद्रूच्या घरी फोन करुन अपहरण झाल्याची माहिती दिली. 'चंद्रू सुखरुप हवा असेल, तर माझ्या गर्लफ्रेंडला माझ्याकडे पाठवा,' अशी धमकीच वामसीने चंद्रूच्या कुटुंबीयांना दिली. वामसीने अनेकदा फोन करुन पीडित कुटुंबाला त्रास दिला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करुन वामसीचा पाठलाग सुरु केला. आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वामसी पुणे स्थानकात उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि अपहृत मुलाची सुटका केली.