पत्नी ऑफिसमधल्या सहका-याच्या बाईकवर बसली म्हणून पतीने कोयत्याने वार करुन केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 13:14 IST2018-01-25T13:06:24+5:302018-01-25T13:14:47+5:30
पत्नी तिच्या ऑफिसमधल्या सहका-याच्या दुचाकीवर बसली म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

पत्नी ऑफिसमधल्या सहका-याच्या बाईकवर बसली म्हणून पतीने कोयत्याने वार करुन केली हत्या
चेन्नई - पत्नी तिच्या ऑफिसमधल्या सहका-याच्या दुचाकीवर बसली म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. मंगळवारी रात्री चेन्नईत तिरुवल्लूर येथे ही घटना घडली. एन. नंदिनी (27) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीसोबत भांडण झाल्यामुळे मागच्या महिन्याभरापासून नंदिनी तीन मुलींसह बीमानथोप्पू गावात आपल्या आई-वडिलांच्या घरी रहात होती. पतीच्या सततच्या संशयी स्वभावामुळे दोघांचे भांडण झाले होते.
आरोपी नागराज रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्नामबाक्कम येथे दोघांची वाट पाहत थांबला होता. पत्नी तिथे पोहोचल्यानंतर नागराजने त्याच्या हातातील कोयत्याने बालाजीला धमकावले व तिथून निघून जाण्यास सांगितले. बालाजी तिथून गेल्यानंतर नागराजने त्याच्याजवळच्या कोयत्याने नंदिनीवर वार केले. बालाजी लगेच नंदिनीच्या घरी गेला व तिच्या कुटुंबियांना माहिती दिली.
आई-वडिल धावतपळत घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना नंदिनी बेशुद्धावस्थेत सापडली. त्यांनी लगेच 108 क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली व तिला तिरुवल्लूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात हलवले. तिथे नंदिनीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. ती एका ज्वेलरीच्या दुकानात सेल्समनचे काम करायची.
पोलिसांनी पथके स्थापन करुन नागराजचा शोध सुरु केला आहे. नंदिनी तिच्या ऑफिसमधल्या सहका-यासह बाईकवरुन फिरते हे समजल्यानंतर नागराज अस्वस्थ झाला होता. त्याला नंदिनीचे दुस-याच्या बाईकवर बसणे मान्य नव्हते. त्यांच्यामध्ये अनेकदा यावरुन खटकेही उडायचे. अशाच एका भांडणातून नंदिनी घर सोडून आई-वडिलांकडे निघून गेली होती.