गाय चोरत असल्याच्या संशयावरुन जमावाची बेदम मारहाण; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 10:40 AM2019-07-04T10:40:40+5:302019-07-04T10:41:42+5:30
जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं सत्र सुरुच
धलाई: गाय चोरत असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील रायश्याबरीमधील मान्याकुमार पारा या दुर्गम गावात हा प्रकार घडला. गायीची चोरी करत असल्याच्या संशयावरुन जमावानं बुधी कुमार यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.
बुधी कुमार एका ग्रामस्थाच्या घराजवळ असलेल्या गोठ्यात गेले होते. त्यांना पाहताच गोठ्याच्या मालकानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर इतर ग्रामस्थ तिथे जमा झाले. त्यांनी बुधी यांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस उपमहासंचालक अरिंदम नाथ यांना दिली. 'बुधी कुमार पकडून जाण्याचा प्रयत्न करताना काहींनी त्यांना पकडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर संतप्त जमावानं त्यांना जबर मारहाण केली,' असं नाथ यांना सांगितलं.
रायश्याबरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बुधी कुमार यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर जखमी झाल्यानं सकाळी त्यांचा मृत्यू झाला. बुधी यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. गायींची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या घटनेनंतर त्रिपुरा गोरक्षा वाहिनीचे अध्यक्ष मुर्तजा उद्दीन चौधरी यांनी केली.