चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोरच विवाहित जोडप्यानं रचला बनाव; सत्य समोर येताच अधिकारी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 01:14 PM2021-10-19T13:14:19+5:302021-10-19T13:16:44+5:30
नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार, सीडीओ गौरव सिंह यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी होते.
महराजगंज – उत्तर प्रदेशातील महराजगंजमध्ये मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेत बनावट प्रकार उघडकीस आला आहे. १३ सप्टेंबरला जिल्हा मुख्यालयाच्या महालक्ष्मी लॉनवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत २३३ जोडपं विवाहाच्या बंधनात अडकलं. त्यातील काही असे आहेत ज्यांचं याआधीच लग्न झालं आहे. काहींची तर मुलं आहेत. हे सगळं सरकारी अनुदान लाटण्यासाठी केल्याचं समोर आल्याने खळबळ माजली.
अनेक जोडप्यांनी त्यांची वैवाहिक स्थिती लपवून अधिकाऱ्यांसोबत मिळून विवाहस्थळी येऊन बसले होते. परंतु हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकारी आणि विवाह योजनेतील पात्रता तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. १३ सप्टेंबर रोजी शासनाच्या निर्देशाने मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेचं आयोजन करण्यात आले होते. विवाहस्थळ मोठ्या थाटामाटात सजवण्यात आला होता. लग्नासाठी २३३ जोडप्यांचे रजिस्ट्रेशन आणि त्यांच्या धर्मानुसार लग्न लावण्यात आले.
नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार, सीडीओ गौरव सिंह यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी होते. लग्नानंतर शासन आदेशाप्रमाणे जोडप्यांना निर्धारित अनुदान रक्कम आणि भेट शासनाकडून देण्यात आली. या विवाह सोहळ्याच्या दरम्यान एका जोडप्याचा बनाव सगळ्यांसमोर उघड झाला. कोल्हुई येथील अमरनाथ चौधरी यांचा पुत्र रामनाथ चौधरीने त्याच्या विवाहित मेव्हणीसोबत सरकारी अनुदानासाठी बनावट लग्न केले. तो स्वत:हा विवाहित आहे आणि त्याला मुलंही आहेत.
इतकचं नाही तर सरकारी अनुदान लाटण्यासाठी या सामुहिक विवाहसोहळ्यात रामनाथ चौधरीची पत्नीही उपस्थित होती. पैशाच्या लालसेपोटी बहिणीचं पतीसोबत लग्न करण्यासाठी तिने पुढाकार घेतला होता. परंतु ही गोष्ट समोर येताच सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांची बोलती बंद झाली. याबाबत ग्रामसेवक मुरलीधर चौधरी यांनी सांगितले की, मला ही गोष्ट आत्ताच समजली. दोन मुलांचा बाप पत्नीसमोर फक्त सरकारी अनुदान घेण्यासाठी विवाहित मेव्हणीशी लग्न करतो हे कसं होऊ शकतं? सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीडीओ गौरव सिंह यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आणखी काही प्रकार समोर येण्याची शक्यता असून दोषींवर कारवाई करू असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.