VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 08:26 PM2020-01-28T20:26:50+5:302020-01-28T21:04:02+5:30
आंदोलकांनी बंदुकधाऱ्याला पकडलं; अद्याप पोलीस तक्रार नाही
नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनात आज एक बंदुकधारी घुसल्यानं खळबळ निर्माण झाली. या बंदुकधाऱ्यानं आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आज दुपारच्या सुमारास शाहीन बागेत दोन जण घुसले होते. त्यातल्या एकाकडे बंदूक होती. आंदोलकांनी संपूर्ण परिसर रिकामा करावा. अन्यथा माणसं मारली जातील, अशी धमकी या व्यक्तीनं दिली. या व्यक्तीला आंदोलकांनी ताब्यात घेतलं.
दुपारी तीनच्या सुमारास बंदुकीसह शाहीन बागेत घुसलेल्या एका व्यक्तीनं व्यासपीठावर चढून उपस्थितांना आंदोलन संपवण्यासाठी धमकावलं. काही उपस्थितांनी त्याला पकडून त्याच्या हातातली बंदूक काढून घेतली. यानंतर त्याला मारहाणदेखील करण्यात आली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी सईद तासीर अहमदनं दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहीन बाग आंदोलनाशी संबंधित एका ट्विटर अकाऊंटवरुनदेखील हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. 'आंदोलन परिसरात बंदुकधारी समाजविघातक घटकांची घुसखोरी', या मजकूरासह हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
#WATCH A person who had gone to Shaheen Bagh to talk to protestors brandished a licensed pistol at the protest site, today. More details awaited. (Source - Delhi Police) pic.twitter.com/kHFbUnt8KG
— ANI (@ANI) January 28, 2020
दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यानं शाहीन बागेतले आंदोलक अतिशय सतर्क झाले आहेत. लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं शाहीन बागेत यावं, असं आवाहन आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या व्यक्तीकडे बंदुकीचा परवाना होता, असंदेखील पोलिसांनी सांगितलं.
शाहीन बागेत गेल्या महिन्याभरापासून सीएए, एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. शांततापूर्ण मार्गानं करण्यात येणाऱ्या या आंदोलनाचं काही जणांकडून कौतुक होत आहे. तर आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्यानं काही जण यावर टीकादेखील करत आहेत.