माझी बायको महिला नाही, पुरुष आहे! पतीची सर्वोच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 05:53 PM2022-03-12T17:53:03+5:302022-03-12T17:53:23+5:30
पत्नीविरोधात पती सर्वोच्च न्यायालयात; विश्वासघात झाल्याचा दावा, कारवाईची मागणी
नवी दिल्ली: पत्नीविरोधात गुन्हेगारी खटला नोंदवण्याची मागणी एका पतीनं याचिकेच्या माध्यमातून केली आहे. पत्नीनं विश्वासघात केल्याचा दावा पतीनं केला आहे. माझी पत्नी महिला नसून पुरुष असल्याचा पतीचा दावा आहे. पतीनं न्यायालयाकडे एक वैद्यकीय अहवाल सुपूर्द केला आहे.
याचिकाकर्त्याची पत्नी जन्मत: इम्परफोरेट हायमन विकारानं ग्रस्त आहे. यामध्ये न उघडताच हायमन योनीला पूर्णपणे बाधित करतं. पतीच्या याचिकेवर विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली आहे. या प्रकरणी काल न्यायालयात सुनावणी झाली. पतीच्या वतीनं वरिष्ठ वकील एन. के. मोदींनी बाजू मांडली. या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा. कारण पत्नीनं पतीची फसवणूक केली आहे, अशी मागणी मोदींनी केली.
पत्नी महिला नसून पुरुष आहे. त्यामुळे पतीसोबत विश्वासघात झाला आहे. न्यायालयानं वैद्यकीय अहवाल पाहावा. माझ्या अशीलाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. लग्न करताना आरोपीला तिच्या गुप्तागांबद्दल माहिती होती. मात्र तिनं ती लपवली, असा युक्तिवाद वकिलांनी केला.
अपूर्ण हायमन असल्यानं पत्नीला महिला म्हटलं जाऊ शकत नाही. त्यासाठी वैद्यकीय अहवाल पुरावा आहे, असं वकील म्हणाले. त्यावर अपूर्ण हायमन असल्यानं पत्नी महिला नसल्याचं तुम्ही म्हणू शकता का? महिलेचं गर्भाशय सामान्य असल्याचं वैद्यकीय अहवाल सांगतो, याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं.
पत्नीकडे केवळ एक छिद्र असलेलं हायमनच नाही, तर एक लिंगदेखील असल्याचं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. लिंग असल्यावर पत्नी महिला कशी होऊ शकते, असा सवाल वकिलांनी विचारला. त्यावर तुमच्या अशिलाची नेमकी मागणी काय, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. त्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात यावा आणि पत्नीसह तिच्या वडिलांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांना शिक्षा व्हावी, असं उत्तर वकिलांनी दिलं.