वडिलांनी हुंड्यासाठी ज्या मुलीसोबत नातं नाकारलं; लेकाने तिच्याशीच केलं लग्न, घेतले सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:10 PM2023-08-17T18:10:05+5:302023-08-17T18:19:58+5:30
अनाथ मुलीला मुलाने आपलं जोडीदार बनवलं, हुंड्यामुळे घरच्यांनी त्यांचं लग्न मोडलं होतं.
बिहारमधील नवादा येथून एक अजब घटना समोर आली आहे. एका पित्याने हुंड्यामुळे मुलाचे लग्न रद्द केले. यानंतर मुलाने जे पाऊल उचललं त्याचं आता लोकं भरभरून कौतुक करत आहे. त्याच अनाथ मुलीला मुलाने आपलं जोडीदार बनवलं, हुंड्यामुळे घरच्यांनी त्यांचं लग्न मोडलं होतं.
हे प्रकरण शेखपुरा जिल्ह्यातील अरियारी ब्लॉकच्या हजरतपूर मडरो पंचायतीशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या सुषमा कुमारी यांचे लग्न नवादा जिल्ह्यातील नरदिगंज येथील रहिवासी सचिन कुमार यांच्यासोबत निश्चित झालं होतं. मुलीच्या पालकांचं निधन झालं आहे. त्यामुळेच हे लग्न कुटुंबातील इतर सदस्यांनी ठरवलं होतं.
मुलाच्या वडिलांनी मात्र हुंड्यात भरमसाठ रकमेची मागणी केल्याने मुलीच्या कुटुंबाला धक्का बसला. घरच्यांनी हुंडा देण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर सचिनच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला. दरम्यान, सचिनला जेव्हा हे संपूर्ण प्रकरण कळले तेव्हा त्याने सुषमाशी चर्चा केली. हुंड्यासाठी त्याला लग्न मोडायचं नव्हतं.
सचिनने वडिलांना आणि घरातील कोणालाही न सांगता नवादाहून शेखपुरा गाठलं. मुलीच्या घरी जाऊन चर्चा केली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी पुढाकार घेतला आणि दोघांनी कोर्टात लग्न केलं. यानंतर अरघौती मंदिरात जाऊन देवाला साक्षी ठेवून विधी पूर्ण केले. सचिनच्या या कृत्याचं लोक कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.