लग्नानंतर वाढलेला खर्च भागविण्यासाठी वकिलाने लुटली बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 09:10 AM2017-07-28T09:10:59+5:302017-07-28T09:14:12+5:30
लग्नानंतर खर्च वाढल्याने चिंतेत असलेल्या वकिलाने चक्क बँक लुटल्याची घटना घडली आहे. मोहालीमध्ये ही घटना घडली.
चंदीगड, दि. 28- लग्नानंतर खर्च वाढल्याने चिंतेत असलेल्या वकिलाने चक्क बँक लुटल्याची घटना घडली आहे. मोहालीमध्ये ही घटना घडली. बँक लुटल्यानंतर पैसे घेऊन पळून जात असताना त्या वकिलाच्या गाडीची नंबर प्लेट पडली त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना सोपं झालं. त्या वकिलाने पोलिसांना कार स्नॅचिंगची खोटी कहाणी सांगून फसविण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये तो वकील स्वतःच फसला. या वकिलाचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर वाढलेल्या खर्चामुळे त्यांची चिंता वाढली होती. तसंच त्या वकिलाच्या डोक्यावर खूप कर्जसुद्धा असल्याची माहिती त्याने दिली आहे.
आरोपी वकिलाने मोहाली फेस 7च्या इंडस्ट्रिअल एरियामध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून साडे सात लाख रूपये लुटले. मनजिंदर सिंह असं आरोपीचं नाव आहे. आरोपी मनजिंदर यांच्या डोक्यावर कर्ज होतं. त्या कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी त्यांनी बँक लुटून पैसे मिळविण्याचा शॉर्ट कट वापरला. तसंच या आरोपी वकिलाचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे लग्नानंतर खर्चातही वाढ झाली. हा वाढलेला खर्च कसा करायचा? या चिंतेत आरोपी वकील असल्याचं मोहालीचे पोलीस अधिक्षक कुलदीप सिंह चहल यांनी सांगितलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपी नेहमी मोहालीच्या इंडस्ट्रिअल भागाच्या मार्केटमध्ये यायचा. त्या आरोपी वकिलाने अनेक दिवस त्या भागाची रेकी केली होती. त्यातूनच बँकेच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते याची त्याने माहिती मिळवीली होती. बँक लुटल्यानंतर एअरपोर्टच्या रस्त्याने फरार होण्याचं प्लॅनिंगही त्याने केलं होतं. आरोपी वकील मनजिंदर सिंह याने सकाळी बँकेत घुसून दोन गोळ्या झाडल्या आणि साडेसात लाख रूपये घेऊन फरार झाला. बँक लुटल्यानंतर तो वकील घाबरूनच गाडी चालवत होता. त्यावेळी त्याची गाडी एका खांबावर आदळली. त्यामुळे कारची नंबर प्लेट तिथेच पडलं होतं. कारच्या नंबरप्लेटमुळे पोलिसांनी त्याला घटनेनंतर 24 तासाच्या आत शोधून काढलं.