बँक अधिका-याच्या चुकीनं त्याच्या खात्यावर आले 20 लाख, पैसे उधळल्यानंतर अधिका-यांना आली जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 08:10 AM2018-06-30T08:10:40+5:302018-06-30T08:11:03+5:30
गुजरातमधल्या सुरतमध्ये एकाच्या खात्यात 15 लाख नव्हे, तर 20 लाख रुपये जमा झाले आहेत.
सूरत- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. आजमितीस कोणाच्याही खात्यात अशा प्रकारे पैसे टाकण्यात आलेले नाही. परंतु गुजरातमधल्या सुरतमध्ये एकाच्या खात्यात 15 लाख नव्हे, तर 20 लाख रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं 20 लाख रुपये उधळल्यानंतर बँक अधिका-यांना जाग आली आहे.
बँक ऑफ इंडियामधल्या अधिका-याच्या चुकीनं एका व्यक्तीच्या खात्यात 20 लाख जमा झाले. त्याच्या विरोधात आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी परेश गोधानी याच्या बँक खात्यात बँकेची संगणक प्रणाली अद्ययावत करताना चुकीनं 20 लाख रुपये जमा झाले. परेशनं ही रक्कम खर्च केल्यानं बँक मॅनेजर राजीव माथुर यांनी अदाजन पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
बँक अधिका-याच्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर 2017मध्ये बँक ऑफ इंडियाच्या महल रोड शाखेत बँकेची संगणक प्रणाली अद्ययावत करत असताना गोधानीच्या दोन बँक अकाऊंटमध्ये 20.26 लाख रुपये जमा झाले. अशाच प्रकारे इतरांच्या बँक खात्यातही पैसे जमा झाले होते. बँक अधिका-यांना जेव्हा चुकीची उपरती झाली, त्यावेळी त्यांनी तात्काळ खातेधारकांशी संपर्क साधून पैसे परत करण्याची विनवणी केली. गोधानी सोडल्यास इतर खातेधारकांनी पैसे परत केले. परंतु गोधानीनी काही पैसे परत केले नाहीत.
अदाजन पोलिसांच्या माहितीनुसार, गोधानीच्या खात्यात रक्कम जमा होण्यापूर्वी पैसेच नव्हते, पैसे जमा झाल्यानंतर त्याने ते खर्च केले. गोधानीनं डेबिट कार्डाच्या माध्यमातून पैसे खर्च केले. बँक ऑफ इंडियामध्ये गोधानी याचं बचत आणि चालू खाते आहे. या दोन्ही खात्यांमध्ये हे पैसे जमा झाले होते. पोलिसांनी अद्याप आरोपीचा जबाब नोंदवलेला नाही. गोधानीविरोधात योग्य पुरावे मिळाल्यानंतरच त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. गोधानीविरोधात बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.