YouTube वरील व्हिडिओ पाहून स्वतःच करत होता पत्नीची डिलिव्हरी; मुलाचा मृत्यू, पत्नी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 19:53 IST2021-12-20T19:52:44+5:302021-12-20T19:53:04+5:30
लोगनाथनने आपली बहीण गीताच्या मदतीने आणि यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसूती करण्याचा प्रयत्न केले. या दरम्यान दुर्दैवाने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, तर पत्नी बेशुद्ध झाली. यावेळी गोमतीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.

YouTube वरील व्हिडिओ पाहून स्वतःच करत होता पत्नीची डिलिव्हरी; मुलाचा मृत्यू, पत्नी गंभीर
तामिळनाडूतील राणीपेटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका युवकाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्याच नवजात बालकाचा मृत्यू झाला, तर पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.
राणीपेठ येथील एका रुग्णालयात एका महिलेला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. बाळाला जन्म देताना तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुन्नईचे प्राथमिक आरोग्य अधिकारी मोहन यांनी महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर कुठल्याही डॉक्टरच्या मदतीशिवाय युट्यूब वरील व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामुळे महिलेची अशी अवस्था झाली आहे.
32 वर्षीय लोगनाथन याने एक वर्षापूर्वी गोमती नावाच्या तरुणीशी लग्न केले होते. यानंतर काही वेळातच गोमती गरोदर राहिली आणि तिच्या प्रसूतीची तारीख १३ डिसेंबर असल्याचे समजले. मात्र 18 डिसेंबर रोजी गोमती यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. यानंतर लोगनाथनने आपली बहीण गीताच्या मदतीने आणि यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसूती करण्याचा प्रयत्न केले. या दरम्यान दुर्दैवाने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, तर पत्नी बेशुद्ध झाली. यावेळी गोमतीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.
यानंतर गोमती यांना तातडीने पुन्नई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि यानंतर त्यांना वेल्लोर येथील सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुलाच्या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून मुलाच्या वडिलांची चौकशी सुरू आहे.