Man Vs Wild: माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही; बेअर ग्रिल्ससोबत मोदींची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 07:34 AM2019-08-13T07:34:11+5:302019-08-13T08:21:56+5:30
निराशेबद्दल मोदींचा तरुणाईला मोलाचा सल्ला
नवी दिल्ली: डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेली सफारी काल पाहायला मिळाली. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. यामध्ये मोदींनी ग्रिल्ससोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी 'मन की बात' केली. फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं.
मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात नैसर्गिक आव्हानांचा समर्थपणे सामना करणाऱ्या मोदींचं ग्रिल्सनं कौतुक केलं. माझा दृष्टीकोन विकासाचा आहे आणि लोकांची स्वप्नं पूर्ण करुन मला आनंद मिळतो, असं मोदी यांनी ग्रिल्सला सांगितलं. माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. तुम्हाला आयुष्यात कधी नकारात्मकता जाणवली का, असा प्रश्न ग्रिल्सनं विचारला. त्यावर तो माझ्या स्वभावाचा भागच नसल्याचं उत्तर मोदींनी दिलं. ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात सहभागी झालेले मोदी हे दुसरे राष्ट्रप्रमुख ठरले. याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमात दिसले होते.
बेअर ग्रिल्ससोबत साधलेल्या संवादातून मोदींनी तरुणांना सल्लादेखील दिला. 'तुमच्या आयुष्याकडे तुकड्या तुकड्यांच्या स्वरुपात पाहू नका. जीवनाकडे व्यापक नजरेनं पाहा. जगताना चढ-उतार येणारच. आयुष्यात वाईट टप्पा आल्यावर त्याबद्दल फार विचार करू नका. कारण वर जाणारा रस्ता खालूनच सुरू होणार असतो,' असं मोदी म्हणाले. 'मला आयुष्यात कधीही नकारात्मकता किंवा भीती जाणवली नाही. कारण मी खूप सकारात्मकपणे विचार करतो. माझा स्वभावच तसा आहे. मी प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पाहतो. त्यामुळेच कधीच माझा अपेक्षाभंग होत नाही,' अशा शब्दांत मोदींनी तरुण पिढीला मार्गदर्शन केलं.