Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:06 AM2024-07-07T09:06:48+5:302024-07-07T09:15:36+5:30

Hathras Stampede : किशोरी लाल यांच्या पत्नी आणि मुलाचा सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

man who lost his family in bhole baba Hathras Stampede | Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना

Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना

हाथरसच्या घटनेने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. याच दरम्यान अनेक डोळे पाणावणाऱ्या घटना रोज समोर येत आहेत. आता अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. किशोरी लाल यांच्या पत्नी आणि मुलाचा सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

४८ वर्षीय किशोरी लाल हे पश्चिम उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील बिसौली गावचे रहिवासी आहेत. या घटनेत त्यांची पत्नी आणि अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना किशोरी लाल म्हणाले की, "लग्नानंतर २० वर्षे वाट पाहिल्यावर आम्हाला मुलगा झाला होता. पत्नी सत्संगासाठी गेली होती आणि सोबत मुलाला देखील घेऊन गेली होती."

"मी कासगंजला शेतीसाठी काही सामान घेण्यासाठी गेलो होतो. मी परत आल्यावर पत्नीला फोन केला. त्याचवेळी कोणीतरी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती दिली. हे समजताच मी रुग्णालयाकडे धाव घेतली असता सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडलेले दिसले. यापैकी बहुतांश महिला आणि मुलं होती. तिथेच मला माझी बायको आणि मुलगा स्ट्रेचरवर दिसला. मी का जिवंत आहे? मीही त्यांच्यासोबत जायला हवं होतं."

स्थानिक रहिवासी सूर्यदेव यादव यांनी सांगितलं की, जीव गमावलेल्या बहुतेक मुलांचं वय १० वर्षांपेक्षा कमी आहे. वृत्तानुसार, घटनेच्या वेळी एटामधून जात असलेला सोनू शर्मा सांगतो, "मी राष्ट्रीय महामार्गावरील घटनास्थळाजवळून जात होतो आणि परिस्थिती पाहून मला धक्काच बसला. मी रस्त्याच्या कडेला लोक मृतावस्थेत पडलेले पाहिले. मला काही कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे..."

"मला हायवेवरील दुभाजकाजवळ एक लहान मुलगीही दिसली. मी लगेच तिच्याकडे गेलो. तिचं वय असेल ८-९ वर्षे. मी तिला माझ्या हातात उचललं तेव्हा तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. इतर अनेक मुलं आणि महिलांचे मृतदेह दिसले. मी जे पाहिलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही" असंही त्याने म्हटलं आहे. 
 

Web Title: man who lost his family in bhole baba Hathras Stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.