'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:15 PM2022-07-21T19:15:29+5:302022-07-21T19:24:08+5:30
'पृथ्वी नेहमीसाठी सुरक्षित राहणार नाही, मानवदेखील डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.'
नवी दिल्ली: सध्या जगातील अनेक देश चंद्र आणि मंगळावर राहण्याच्या शक्यता पडताळत आहेत. याबाबत अनेक वर्षांपासून संशोधनदेखील सुरू आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी चंद्र आणि मंगळवार राहण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. अनेकजण विचारतात की मानवाला अवकाशात पाठवण्याची काय गरज? आपली पृथ्वी राहण्यासाठी योग्य जागा आहे, मग अवकाश प्रवास कशाला? याला उत्तर देताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'डायनासोरप्रमाणे एक दिवस मानव पृथ्वीवरुन नष्ट होईल. एकतर तो स्वत: याला जबाबदार असेल किंवा निसर्ग त्याला नष्ट करेल.'
एका कार्यक्रमात बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'चंद्र आणि मंगळावर सातत्याने लघुग्रहांचा आघात होत असतो. कारण तेथील वातावरण आणि संरक्षणासाठी उपलब्ध नसलेले तंत्रज्ञान. पण, पृथ्वीवर अनुकूल वातावरण आहे, ज्यामुळे आपण अनेक वर्षांपासून लघुग्रहांच्या हल्ल्यापासून वाचत आलो आहोत. पण, मानव पृथ्वीवर कायम राहणार नाही. डायनासोर नष्ट झाले, त्याप्रमाणे मानवदेखील नष्ट होईल. मानवाने राहण्यासाठी नवीन जागा शोधली नाही, तर एक दिवस पृथ्वीसह मानवाचाही अंत होईल.'
मानवी अंतराळ उड्डाणाची का गरज आहे?
'अंतराळ संशोधनासाठी अंटार्क्टिकावर जगभरातील अनेक देशांनी केंद्रे उभारली आहेत. भारताचेही तेथे तीन केंद्रे आहेत. याची काय गरज काय होती? भविष्यात आपण ठराविक क्षेत्रात पाऊल ठेवले नाही तर आपण तेथून बाहेर फेकले जाऊ. भारताने चंद्रावर पाऊल ठेवले नाही तर भविष्यात जगभरातील लोक तेथे जातील आणि भारताला येऊ देणार नाहीत. त्यामुळेच या अभ्यासासाठी भारताने अंटार्क्टिकामध्ये केंद्र उभारले आहे.'
लवकरच भारताचे स्पेश स्टेशन असेल
सोमनाथ पुढे म्हणाले की, 'गगनयान हा एक नवीन प्रयत्न आहे. यावर्षी आपण मानवी स्पेसफ्लाइट एक्सपो सुरू करत आहोत. 100 वर्षांनंतर आपण अंतराळात आपले स्पेस स्टेशन बनवू. फक्त गगनयानापर्यंत थांबणार नाही. भविष्यात जगातील मोठ्या अंतराळ मोहिमेत अनेक मोठे देश सामील होतील, तेव्हा त्यात भारतातील अंतराळवीरांचाही समावेश असायला हवा.'
पुढच्या पिढ्या सौरमालेच्या बाहेर जातील
सोमनाथ म्हणाले की, 'भारताने चांद्रयान-1, मंगळयान यासह अनेक मोहिमा केल्या आहेत, ज्यामुळे आपला देश, आपले शास्त्रज्ञ, आपले लोक आणि आपली इस्रो जगातील कोणत्याही देशाशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांची सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धी. म्हणूनच आम्ही त्यांना हवामान, शेती, आपत्ती, जलवाहतूक, दळणवळण अशा सुविधा देत आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या केवळ इतर ग्रहांवरच नव्हे तर सूर्यमालेतील आणि त्यापुढील ग्रहांवरही जातील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.