VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:58 PM2024-07-25T13:58:49+5:302024-07-25T13:59:50+5:30
हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ बुधवारी मध्यरात्री ढगफुटीमुळे, अंजनी महादेव नदीच्या नाल्याला मोठा पूर आला आहे.
Manali Cloudburst : हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये सोलांग व्हॅलीमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री मुसळधार पावसानंतर अंजनी महादेव नाल्यात पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक पूर आला. त्यामुळे धुंडी ते पालचन आणि मनाली शहरापर्यंत पाणी पोहोचलं. नाल्याच्या ओबडधोबड स्वरूपामुळे बियास नदीच्या पाण्याच्या पातळीही वाढली. पालचन पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने रस्त्याचे नुकसान झाले. पुरामुळे पुलावर मोठमोठे दगड आणि डेब्रिज साचले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मनाली-लेह महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.
बुधवारी मध्यरात्री मनालीत ढगफुटीमुळे अंजनी महादेव नदी व आखरी नाल्याला पूर आला होता. या ढगफुटीमुळे बियास नदीलाही पूर आला. ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे पालचन येथे दोन घरे वाहून गेली आहेत. तसेच ढगफुटीमुळे लेह मनाली महामार्गाचेही नुकसान झाले आहे. लेह मनाली हायवेवर बांधलेल्या पुलावर मोठे दगड पडले आहेत. पालचनजवळ रात्री मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग-००३ वर ढगफुटी झाली होते. रोहतांग पासमधून लाहौल व्हॅलीमध्ये वाहतूक सुरु आहे. कुल्लू आणि लाहौल स्पिती पोलिसांनी आता यासंदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. मनालीमध्ये सध्या हवामान स्वच्छ असून ही दिलासादायक बाब आहे.
मनाली में बादल फटने से भारी तबाही, पलचान में मची अफरा-तफरी pic.twitter.com/qU33dDrRwW
— swati8saini (@swati8saini) July 25, 2024
कुल्लू मनालीमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनालीमध्ये ढगफुटीमुळे पालचनपर्यंत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अंजनी महादेव नाला तुडुंब भरला आहे. त्यामुळे मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गावर मोठे दगड वाहून आले आहेत. यामुळे महामार्ग आता बंद झाला आहे. पालचन, रुआड आणि कुलंग गावात पुरामुळे गोंधळ उडाला होता. नदीतून येणाऱ्या भयानक आवाजाने सगळेच घाबरले होते. पोलीस आणि प्रशासनाचे पथक मदतीसाठी पोहोचलं आहे. ढगफुटीमुळे दोन घरे, एक पूल आणि वीज प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, नदीचा प्रवाह वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना नदीच्या नाल्यांकडे न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्व वाहने अटल टनेल नॉर्टे बंदरातून रोहतांग पास मार्गे मनालीला पाठवली जात आहेत. अशा परिस्थितीत, पर्यायी मार्गांचा विचार करा आणि अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.