यूपीतील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; मदरसा शिक्षण मंडळाकडून आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:25 AM2022-05-13T06:25:30+5:302022-05-13T06:25:45+5:30
२४ मार्च रोजी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशच्या सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी मागील ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले होते.
आदेशात म्हटले आहे की, २४ मार्च रोजी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. राज्यात रमजान महिन्याच्या कालावधीत मदरशांना ३० मार्च ते ११ मेपर्यंत सुटी जाहीर झालेली होती. १२ मेपासून नियमित वर्ग सुरू होतील. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हे आदेश लागू करण्यात आले.
आदेशात म्हटले आहे की, सर्व मान्यताप्राप्त अनुदानित व गैरअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी अन्य प्रार्थनांसमवेत शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनींना राष्ट्रगीत गायन अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित रूपाने देखरेख करावी लागेल.
शिक्षक संघ मदारिक अरबियाचे सरचिटणीस दिवान साहब जमां खान यांनी सांगितले की, मदरशांमध्ये आजवर वर्ग सुरू होण्यापूर्वी हम्द व सलाम होत आहे. काही ठिकाणी राष्ट्रगीत होत होते. परंतु, ते अनिवार्य नव्हते. आता ते अनिवार्य करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
१६,४६१ मदरशे
राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री धर्मपाल सिंह यांनी मागील काही महिन्यांपासून मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे शिक्षण देण्यावर भर दिला होता. राज्यमंत्री दानिश आजाद अन्सारी यांनीही म्हटले होते की, मदरशांमधील विद्यार्थी देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत व्हावेत, अशी सरकारची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात सध्या १६,४६१ मदरशे आहेत. त्यापैकी ५६० मदरशांना सरकारचे अनुदान प्राप्त आहे.