बाबो! कारच्या बॉनेटमध्ये कोंबले होते 2 कोटी रुपये, इंजिनला लागली आग अन्...
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 2, 2021 02:12 PM2021-02-02T14:12:05+5:302021-02-02T14:15:27+5:30
संबंधित आरोपी चलनी नोटा कारच्या बोनटमध्ये लपवून नेत होते. मात्र, इंजिनला आग लागल्याने त्यांनी कार थांबवली आणि बोनट उघडले, अन्...
सिवनी - मध्य प्रदेशातील सिवनी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एक अजब नजारा बघायला मिळाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील लोकांनी एका कारमधून 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा उडताना बघितल्या. यानंतर कुणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजीनमधून धूर निघताना पाहून कारमधील लोकांनी उतरून इंजिन तपासण्यासाठी बोनट उघडले, तेवढ्यात जळालेल्या नोटा उडून खाली पडू लागल्या.
या प्रकरणी सीवनी जिल्हा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 1.74 कोटी रुपयांच्या सुरक्षित नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींनी दावा केला आहे, की ते जवळपास दोन कोटी रुपये बोनटमध्ये लपवून घेऊन जात होते.
यासंदर्भात कुराई पोलीस ठाण्याचे एसएचओ मनोज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संबंधित आरोपी चलनी नोटा कारच्या बोनटमध्ये लपवून नेत होते. मात्र, इंजिनला आग लागल्याने त्यांनी कार थांबवली आणि बोनट उघडले. मात्र, हवा जोरात असल्याने बोनट उघडताच अर्धवट जळालेल्या नोटा रस्त्यावर उडू लागल्या. हे पाहून स्थानिक लोकांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली.”
यानंतर पोलीस घटनास्थी पोहोचण्यापूर्वीच संबंधित आरोपींनी घटना स्थळावरून पळ काढला. मात्र, हायवे पोलिसांनी त्यांना पकडले. एका स्थानिक नागरिकाने त्यांच्या कारचा नंबर नोट केलेला होता. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर मुंबईचा होता. या तीनही आरोपींची ओळख झाली असून, सुनील आणि न्यास हे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे आहेत तर हरिओम आजमगडचा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवून पोलीस पुढील तपास करत आहे.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, ते वाराणसीहून मुंबईला सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी चालले होते. तसेच ते याच मार्गाने परतही जाणार होते. पोलिसांनी सांगिल्याप्रमाणे, आरोपींनी दावा केला आहे, की टॅक्स वाचविण्यासाठी ते अशा पद्धतीने पैसै नेत होते. ही सर्व रक्कम वाराणसीतील एका ज्वेलरची आहे. आरोपींनी दिलेल्या या माहितीवरू आता पोलीसांनी पुढील तपास सुरू केला असून आयकर विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.