"सैन्यात असताना गोळ्यांची कधी भीती वाटली नाही पण आता घरात राहायची भीती वाटतेय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 10:30 AM2023-08-20T10:30:02+5:302023-08-20T10:30:27+5:30
सरकाघाटातील रोपर्डीजवळील कंदौल गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. सरकाघाटातील सैनिकांच्या गावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. राज्यातील मंडी जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. मंडी जिल्ह्य़ातील सरकाघाट येथील पटडीघाट येथे डोंगराला तडे गेले आहेत. दुसरीकडे सरकाघाटातील रोपर्डीजवळील कंदौल गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. सरकाघाटातील सैनिकांच्या गावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
कंदौल गावातील 64 वर्षीय माजी सैनिक नारायण दत्त यांच्यावरही पावसामुळे आपत्ती ओढवली आहे. आयुष्यभराची कमाई त्यांनी घरासाठी खर्च केली. आता घर कोसळण्याच्या मार्गावर आहे. घराला भेगा पडल्या आहेत. 6 दिवसांपासून त्रासलेले, माजी सैनिक नारायण दत्त यांनी सांगितले की त्यांनी 35 वर्षे सैन्यात सेवा केली. डोगरा रेजिमेंटमध्ये राहिले. जम्मू-काश्मीर आणि सियाचीन ग्लेशियरमध्येही सेवा केली आहे. त्यांनी सांगितले की कंदौल गावात प्रत्येक घरात एक सैनिक आहे.
सियाचीनमध्ये कर्तव्य पार पाडत असताना कोणतीही भीती नसल्याचं नारायण दत्त यांनी सांगितलं. गोळ्यांची कधी भीती वाटली नाही. मात्र आता या आपत्तीची भीती वाटत आहे. सहा दिवस दिव्याच्या प्रकाशात जगतो आहोत. प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने गावाची स्थिती काय आहे, याबाबत विचारणा केली नाही. नेत्यांनीही गावाची दखल घेतली नाही. राजकारणी मतं गोळा करायला येतात, असेही गावातील इतर लोक सांगतात. पण आता कोणी विचारायला येत नाही.
पाटी गावात अनेक घरांवर दगड पडण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत लोक तंबूत राहत आहेत. यासोबतच घरांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. सरकाघाटापासून गावाचे अंतर 15 किमी आहे. सध्या लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील तरुणांनीही मुख्य रस्त्याची स्वत: स्वच्छता केली आहे. पावसामुळे गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.