"भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 09:22 PM2021-07-11T21:22:41+5:302021-07-11T21:24:42+5:30
भाजप खासदार सुधीर गुप्ता यांचं वादग्रस्त विधान
मंदसौर: जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीदेखील लवकरच लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.
देशाची लोकसंख्या अनियंत्रित होण्यात आमिर खानसारख्या लोकांचं हात आहे आणि हे देशाचं दुर्दैव आहे, असं गुप्ता म्हणाले. 'आमिर खानला पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी पत्नी किरण राव मुलांसोबत कुठे भटकणार याची चिंता नाही. पण आमिरनं तिसरीचा शोध सुरू केला आहे. एका हिरोचा हा संदेश आहे का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
२०३० पर्यंत लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२१ ते २०३० कालावधीसाठी लोकसंख्या धोरण लागू केली आहे. 'गरिबी आणि अपुऱ्या शिक्षणामुळे लोकसंख्या वाढते. काही समुदायांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. नवं लोकसंख्या धोरण २०३० पर्यंत लागू असेल,' असं योगी आदित्यनाथ नव्या धोरणाची घोषणा करताना म्हणाले.