Mandsaur Gangrape: नुकसानभरपाई नको, त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, पीडितेच्या वडिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 12:00 PM2018-07-01T12:00:38+5:302018-07-01T12:00:46+5:30
आम्हाला पैसे नको, परंतु त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मध्य प्रदेशातल्या बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
नवी दिल्ली- आम्हाला पैसे नको, परंतु त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मध्य प्रदेशातल्या बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. मला कोणतीही नुकसानभरपाई नको, आरोपींना फाशी व्हावी ही माझी इच्छा आहे. तत्पूर्वी शनिवारी डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी करत मुलीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे.
शिवराज सिंह चौहान सरकारनं पीडितेच्या वडिलांना पैसे देण्याचा प्रयत्न केला असता, वडिलांनी पैसे नको, आरोपींना फासावर चढवा, अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशच्या महिला आणि बालविकासमंत्री अर्चना चिटणीस म्हणाल्या, मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी पीडितेच्या वडिलांच्या बँक खात्यात 5 लाख रुपये जमा केले आहेत. पोलीस आरोपींना लवकरात लवकर अटक करेल, अशी आशा आहे. जेणेकरून त्यांना फासावर लटकवलं जाईल. मुलीची रुग्णालयाचं बिल आणि शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
मध्य प्रदेशमधल्या मंदसोरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या या चिमुकलीचे इरफान उर्फ भैय्यू (20) याने अपहरण करून तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने दिल्लीत 2012साली नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर सहा जणांनी सामुदायिक बलात्कार केला होता, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
I do not want any compensation. I just want the accused to be hanged: Father of the 8-year-old girl who was raped in #Mandsaur#MadhyaPradesh (30.06.18) pic.twitter.com/X9KqGblAdl
— ANI (@ANI) July 1, 2018