युद्धाच्या रणभूमीत बदललं मध्यप्रदेशातील मंदसौर
By Admin | Published: June 8, 2017 09:14 AM2017-06-08T09:14:37+5:302017-06-08T09:21:48+5:30
मंदसौरचा प्रदेश एखाद्या युद्धभूमीसारखा दिसायला लागला आहे.
ऑनलाइन लोकमत
भोपाळ/इंदोर, दि. 8 : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात शेतकरी संपाती धग दिवसेंदिवस वाढत जाते आहे. शेतकऱ्यांचं त्यांच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. मंदसौरचा प्रदेश एखाद्या युद्धभूमीसारखा दिसायला लागला आहे. बुधवारी पिपलियामंडीमध्ये हजारो आंदोलनकर्त्यांनी संचारबंदी लागू असताना त्याचं उल्लंघन करत डीएम आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसंच गाड्या आणि वेअरहाऊस पेटवून दिली. इतकंच नाही तर तेथील दारूची दुकानसुद्धा लुटण्यात आली. संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पंधरा पेक्षा जास्त लक्झरी बसेस जाळून टाकल्या, बसमधून काही जण प्रवास करत होते. या जाळपोळीनंतर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रवासी जवळच्या शेतात जाऊन लपले, अशी माहिती तेथील स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यामध्ये 12 ते 15 पोलीस जखमी झाले आहेत तर पोलीस अधिकारी आर.बी.शर्मा गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो आहे.
मंदसौरमधील वातावरण सध्या अत्यंत खराब झालं आहे. जी लोक आंदोलनात सहभागी होत नाही आहेत अशा लोकांवरसुद्धा निशाणा साधला जातो आहे. मंदसौरचा राज्याच्या दुसऱ्या भागांशी संपर्क तुटला आहे. राजकीय नेत्यांनासुद्धा मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. मध्यप्रदेश भाजपचे प्रमुख नंदकुमार सिंह चौहान आणि कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांना मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं, तर काँग्रेसच्या माजी मंत्री मीनाक्षी नटराजन यांनासुद्धा सुअसरा गावात जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
बरखेडा पंथ गावात एका मृत शेतकऱ्याच्या अंत्ययात्रे दरम्यान हल्ले सुरू झाले होते. मंदसौरचे डीएम स्वतंत्र कुमार सिंह यांनी निदर्शनाच्या जागेवर जाऊन लोकांना समजविण्याता प्रयत्न केला होता पण तेथे त्यांना धक्काबुक्की झाली. डीएला जेव्हा तिथून नेलं जात होतं तेव्हा संतापलेल्या लोकांनी टोलनाक्याला आग लावली आणि पोलिसांवरसुद्धा दगडफेक केली. कापसाच्या एका कारखान्यालासुद्धा संतप्त जमावाने आग लावली होती. आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेड आलं पण त्यांनासुद्धा जमावाने पळवून लावलं आणि गाडीच्या काचा फोडल्या.
मंदरौसमधील पाच किलोमीटर लांब बायपास आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला होता. मोठ्या वाहनांची लुटालुटही करण्यात आली. मंदसौरमधील परिस्थिती कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांवरसुद्धा हल्ले करण्यात आले आहेत.