मनेका गांधी आणीबाणीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या - आर. के. धवन
By admin | Published: June 24, 2015 09:33 AM2015-06-24T09:33:01+5:302015-06-24T10:03:03+5:30
मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असा खुलासा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर. के.धवन यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २४ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांचे खासगी सचिव आर. के. धवन यांनी आणीबाणीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहे. मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असे आर. के. धवन यांनी म्हटले आहे. तसेच राजीव व सोनिया गांधी यांच्या मनात आणीबाणीविषयी कोणताही संदेह अथवा रुखरूख नव्हती असा खुलासाही धवन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
इंदिरा गांधींनी लादलेल्या या आणीबाणीचा भारतीय जनता पक्षाने प्रखर विरोध केला होता, त्यावेळी भाजपाचे अनेक नेते तुरूंगातही गेले होते. आणीबाणीवरून भाजपासह अनेकांनी इंदिरा गांधींवर टीकेचा भडिमार केला होता, मात्र असे असतानाही सध्या भाजपात असलेल्या व मंत्रीपद भूषविणा-या मनेका गांधींना मात्र या सर्व गोष्टींबद्दल पूर्वकल्पना होती हे समोर आल्याने मनेका गांधी अडचणीत सापडू शकतात.
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री एस.एस.राय यांनी १९७५ सालच्या जानेवारी महिन्यातच इंदिरा गांधी यांना आणीबाणी जाहीर करण्याचा सल्ला दिल्ला होता. तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांची आणीबाणीच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास हरकत नव्हती, त्यांनी त्यासाठी तत्काळ सहमती दर्शवल्याचेही धवन यांनी नमूद केले आहे.
मात्र जाहीर करण्यात आलेली आणीबाणी इंदिरा यांची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी लादण्यात आली नव्हती, उलट त्या स्वत:च राजीनामा देण्यास तयार होत्या असेही धवन यांनी स्पष्ट केले. १९७५ सालच्या जून महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांती निवड रद्द केल्याचा निर्णय ऐकल्यावरच त्यांनी आपला राजीनामा तयार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे राजीनामा टाईप करून तयारही होता मात्र मंत्रीमंडळातील इतर सहका-यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले आणि त्या राजीनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही, असे धवन यांनी म्हटले आहे.