पंतप्रधानांच्या वाढदिवसाला मनेका गांधींकडून ‘माखन कटोरी’ भेट
By Admin | Published: September 27, 2015 05:20 AM2015-09-27T05:20:48+5:302015-09-27T05:20:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवशी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडून एक विशेष भेट मिळाली आहे
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवशी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडून एक विशेष भेट मिळाली आहे. ही भेटवस्तू खरोखरच अनोखी आहे. ती अतिशय दुर्मिळ असल्याने मोदींच्या वाढदिवशी ती देता येईल की नाही याची खुद्द मनेकांनाही शाश्वती नव्हती. त्यामुळे तिचा आधीपासूनच शोध घेण्यात आला आणि शेवटी डेहराडून येथे ती सापडली. मनेका गांधी यांनी पंतप्रधानांना दिलेली ही अनोखी भेट म्हणजे पौराणिकदृष्ट्या महत्त्व असलेले आणि पवित्र मानले जाणारे ‘माखन कटोरी’ किंवा ‘फिकस कृष्णा’ नावाच्या वृक्षाचे रोपटे होय.
गेल्या १७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस होता. ‘माखन कटोरी’ हे दुर्मिळ झाड असल्याने ते मोदींच्या वाढदिवशी उपलब्ध झाले नाही. परंतु उशिरा का होईना मनेका गांधी यांनी या झाडाचे रोपटे पंतप्रधानांना भेट दिले. ते रोपटे आता पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील ७, रेसकोर्स मार्ग या निवासस्थानी असलेल्या उद्यानात लावण्यात येईल, अशी आशा आहे.
या झाडाचा पौराणिक संबंध असल्याने त्याला माखन कटोरी हे नाव पडले आहे. भगवान कृष्णाला बालपणी लोणी खूप आवडायचे. ते वृंदावन येथील घरांमधून नेहमी लोणी चोरून आणायचे आणि या चोरीबद्दल आई यशोदा बालकृष्णाला रागवायची.
चोरी सापडली की आई रागावणार म्हणून कृष्ण हे चोरलेले लोणी एका झाडाच्या पानात गुंडाळून लपवून ठेवत असे. कालांतराने या झाडाच्या पानांनी पेल्याचा आकार घेतला आणि तेव्हापासून या झाडालाच ‘माखन कटोरी’ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. ‘फिकस कृष्णा’ हे या झाडाचे जैविक नाव आहे. (वृत्तसंस्था)