इंदिरा गांधींचा कल मनेका यांच्याकडे होता!
By admin | Published: May 13, 2016 04:19 AM2016-05-13T04:19:32+5:302016-05-13T07:41:51+5:30
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती.
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती. परंतु मनेका गांधी त्या वेळी राजीव गांधी यांच्या विरोधकांच्या गोतावळ्यात अडकल्या होत्या. अर्थात इंदिराजींना सोनियांबद्दल जिव्हाळा होता. पण संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मनेकांबद्दल जास्त आपुलकी वाटायला लागली होती. इंदिरा गांधींचे खासगी आरोग्य चिकित्सक के.पी. माथुर यांनी ‘द अनसीन इंदिरा गांधी’ या त्यांच्या पुस्तकात उपरोक्त दावा केला आहे.
सफदरजंग इस्पितळातील माजी डॉक्टर माथुर हे जवळपास २० वर्षे इंदिराजींचे डॉक्टर होते. ते दररोज सकाळी इंदिराजींना भेटत असत आणि १९८४ साली इंदिराजींच्या निधनापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. या काळातील इंदिराजींसोबतचे आपले अनुभव त्यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केले आहेत. इंदिराजींचे हे प्रेम, जिव्हाळा मनेका यांना त्यांच्याजवळ आणू शकला नाही. सोनिया सर्वसाधारणपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असत आणि राजकीय मुद्द्यांवर मात्र मनेका यांचे मत माजी पंतप्रधान लक्षात घेत. मनेका यांना राजकारणाची चांगली समज होती. पण संजय गांधी यांच्या निधनानंतर काही वर्षांतच मनेका यांनी परिस्थितीशी जुळवून न घेता पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले, असेही या पुस्तकात नमूद आहे.
डॉ. माथुर यांच्या सांगण्यानुसार, मनेका नेहमीच राजीव गांधी यांच्या विरोधकांसोबत राहिल्या. यातूनच संजय विचार मंच उदयास आला होता. परंतु मनेका आणि त्यांचे राजीवविरोधी सहकारी या मंचच्या माध्यमाने नेमके काय काम करीत होते हे त्यांना कधीच कळले नाही. संजय विचार मंचच्या लखनौमध्ये झालेल्या संमेलनाचाही या पुस्तकात उल्लेख आहे. इंदिरा गांधी त्या वेळी विदेश दौऱ्यावर होत्या. तेथून त्यांनी मनेका यांना या संमेलनाला मार्गदर्शन न करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु मनेका यांनी त्यांची सूचना धुडकावून संमेलनात भाषण दिले होते.
>पुस्तकानुसार राजीव-सोनिया यांच्या लग्नानंतर सासू-सुनेदरम्यान सामंजस्य होते. सोनिया गांधी आपल्या सासूबार्इंचा आदर करायच्या. अत्यल्प कालावधीतच त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. वाचनाची आवड असलेल्या इंदिराजी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी पुस्तके वाचत असत.
>1966 साली पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर इंदिरा गांधींची सुरुवातीच्या काळातील तणाव, पोखरण चाचणीनंतरची मन:स्थिती, आणीबाणीचा काळ आदी महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना इंदिरा गांधींची नात प्रियंका वाड्रा यांनी लिहिली आहे.