रेल्वेने निघालेल्या मुलाचा फोन बंद पडला; बापाने थेट रेल्वे मंत्र्यांशी साधला संपर्क; नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:37 PM2022-04-21T12:37:18+5:302022-04-21T12:37:33+5:30
16 वर्षीय मुलगा पहिल्यांदाच ट्रेने प्रवास करत होता, यादरम्यान त्याचा फोन बंद झाला. मुलाचा फोन लागत नसल्याने आई-वडील चिंतेत आले.
मंगळुरू: ट्रेनमधून मुले हरवल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, एका ट्वीटने बाप आणि मुलाची भेट घडवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावली. झाले असे की, एक 16 वर्षांचा मुलगा पहिल्यांदाच एकटा ट्रेनने प्रवास करत होता. पण, यादरम्यान त्याचा मोबाईल बंद पडला. त्याच्या घरच्यांचा त्याच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने त्या मुलाचा शोध घेतला.
नेमकं काय झालं?
मंगळुरुमधील 16 वर्षीय शंतनू पहिल्यांदाच एकट्याने वडिलोपार्जित(कोट्टायम, केरळ)कडे प्रवास करण्याचा निर्णय घेतो. या प्रवासाबद्दल तो खूप उत्सुक असतो. आई-वडिलांच्या परवानगीने तो ट्रेनचा प्रवास सुरू करतो. त्याचे आई-वडीलही आनंदी असतात की, आता त्यांचा मुलगा एकट्याने प्रवास करू शकतो. ट्रेन निघते आणि 5 तासांनंतर मुलाचा फोन बंद पडतो. शंतनूचे वडील किशन राव मुलाला फोन करतात, पण फोन लागत नाही.
अवघ्या 34 मिनिटांत शंतनूचा शोध
वारंवार फोन करुनही काहीच संपर्क होत नसल्याने किशनराव घाबरतात आणि त्याला शोधण्यासाठी थेट रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना मदतीसाठी ट्वीट करतात. ट्वीट केल्यानंतर अवघ्या 34 मिनिटांत किशन राव यांचा मोबाईलवर फोन येतो. फोनवर शंतनू बोलतो आणि ठीक असल्याचे सांगतो. त्याचा आवाज ऐकून किशनराव सुटकेचा नि:श्वास सोडतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना 19 एप्रिलची आहे.