ऐन हंगामात आंबा महागला!
By Admin | Published: April 28, 2015 11:45 PM2015-04-28T23:45:40+5:302015-04-28T23:45:40+5:30
मार्चचा शेवटचा पंधरवडा व एप्रिलच्या सुरुवातीला देशभरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळांच्या राजा आंब्याला मोठा तडाखा बसला आहे.
नवी दिल्ली : मार्चचा शेवटचा पंधरवडा व एप्रिलच्या सुरुवातीला देशभरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळांच्या राजा आंब्याला मोठा तडाखा बसला आहे. देशातील प्रमुख आंबा उत्पादक राज्यांत जवळपास ५० टक्के पीक वाया गेले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आंब्याच्या दरात सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे.
‘असोचेम’ने (असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया) गारपीट व अवकाळी पावसाने आंब्याचे झालेले नुकसान व त्याचा निर्यातीवर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला. त्यात हापूस आंब्याचा दर डझनामागे ५०० ते ६०० रुपये झाल्याचे त्यांना आढळले, तर इतर स्थानिक आंब्याला किलोमागे १०० रुपये मोजावे लागत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. ही दरवाढ ६० टक्क्यांच्या घरात आहे.
भारतात उत्तर प्रदेशामध्ये आंब्याचे मोठे उत्पादन होते. अवकाळी पावसाने तेथील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही नैसर्गिक आपत्तीने हापूस आंब्यासह विदर्भ व मराठवाड्यातील पिकाचे नुकसान झाल्याचे ‘असोचेम’च्या अहवालात म्हटले आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यांतही आंब्याला फटका बसला आहे. संबंधित राज्य सरकारांनी आंबा उत्पादकांना नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याचे ‘असोचेम’चे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले.
कमी उत्पादनामुळे साहजिकच निर्यातीवरही परिणाम झाला असून यावर्षी भारतातून खूपच कमी म्हणजे फक्त ४१ हजार २८० टन आंब्याची निर्यात होणे अपेक्षित आहे. त्याचवेळी केवळ १० लाख टन उत्पादन होणाऱ्या पाकिस्तानातून ४० हजार टन आंब्याची निर्यात होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४भारतातून संयुक्त अरब अमिरातीत एकूण निर्यातीच्या जवळपास ६१ टक्के निर्यात होते. त्यानंतर युनायटेड किंगडम (१२ टक्के), सौदी अरेबियात (५ टक्के) भारतीय आंबा निर्यात केला जातो. गेल्या काही वर्षांत भारतातून कतार, अमेरिका, ओमान, कुवेत या देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीतही मोठी वाढ नोंदविली गेली आहे.