मार्केट यार्डमध्ये आंबा दाखल, कर्नाटक हापूसच्या २ डझनच्या २० पेट्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:37 AM2017-12-11T02:37:27+5:302017-12-11T02:46:10+5:30
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापाºयांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करून स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापाºयांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करून स्वागत केले. यंदाच्या सीझनमधील ही पहिलीच आवक असून, गतवर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दाखल झाला आहे.
याबाबत व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी सांगितले, की रविवारी कर्नाटक हापूसच्या २ डझन आंब्याच्या २० पेट्यांची मार्केट यार्डमध्ये आवक झाली आहे.
या दोन डझनच्या पेटीस २५०० रुपये भाव मिळाला आहे. गतवर्षी ३ जानेवारी रोजी आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली होती. त्या वेळी चार डझनच्या पेटीस ३५०० रुपये भाव मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाला आहे.
यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने व आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने चांगल्या उत्पन्नाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु कर्नाटकसह कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा मोठा फटका बसला आहे.
यामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचा परिणाम आंब्याच्या हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटक हापूसची नियमित आवक सुरू होईल, तर रत्नागिरी हापूसची आवक सुरू होण्यासाठी
२० ते २५ जानेवारी उजाडेल, असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला.