मेंगलोर : बंदरावरील मजुरांची कमाई किती? काही लाखांत... तेही काम न करता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 09:42 AM2018-08-13T09:42:04+5:302018-08-13T12:46:29+5:30
मेंगलोर : मेंगलोरच्या बंदरावर दररोज लाखो टनांच्या मालाचा चढ-उतार होतो. मात्र, एकही किलोचाही माल न उचलता तेथील कामगार महिन्याला लाख रुपयांची कमाई करत आहेत. अशा प्रकारचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने देशभरातील इतर पोर्ट ट्रस्टनाही चौकशीचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकमधील मेंगलोर बंदरावर हा प्रकार काही वर्षांपासून होत होता. पोर्ट ट्रस्टचे नवे अध्यक्ष एम.टी. कृष्णा यांनी रुजू होताच सर्व भागधारकांची बैठक घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की बंदरावरील चार ठिकाणच्या क्रेनसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे आकारले जातात. यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी माल उतरवर आहोत. या तक्रारीनंतर कृष्णा यांनी केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आले.
प्रत्येक शिफ्टमध्ये 10 मजूर तैनात
या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये 10 मजूर तैनात असतात. याला राष्ट्रीय आरक्षण म्हणतात. यानुसार या मजुरांना कोणतेही काम नसताना आरक्षित केले गेले. आणि त्यांना कोणतेही काम न देता प्रत्येक महिन्याला 60 ते 80 हजार रुपयांचे वेतन दिले गेले.
अशाच प्रकारे मागील महिन्यापर्यंत जहाजांमध्ये सामान चढविणारे- उतरविणाऱ्या मजुरांना एका टनाला 3 रुपये मजुरी देण्यात आली . महत्वाचे म्हणजे त्यांना केवळ 1.30 रुपये चेकद्वारे तर उर्वरित रक्कम रोख स्वरुपात देण्यात आली. अशाप्रकारे एक मजुर महिन्याला 2.5 लाखांपर्यंत कमाई करत आहे. या प्रकरणात कृष्णा यांनी मजुरांची संघटना आणि इतर संघटनांसोबत बैठका घेतल्या आणि त्यांना बंदरांच्या भल्यासाठी असे प्रकार न करण्यास बजावले आहे. तसेच त्यांना सुधारण्यासाठी 15 दिवसांची वेळ दिल्याचे कृष्णा यांनी सांगितले.
देशातील अन्य 11 पोर्ट ट्रस्टनाही अलर्ट
या मजुरांच्या कामाईतून क्रेन ऑपरेटरांनाही पैसा मिळत होता. यामुळे ते जादा मालाची चढ-उतार करायचे. हा प्रकार समोर आल्याने कदाचित कारवाई रोखण्यासाठी पोर्ट ट्रस्ट आणि श्रमिक संघाकडून बंदरावरील यांत्रिकीकरणाविरोधात संप पुकारण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातील अन्य 11 मोठ्या बंदरांच्या प्रशासनाला त्यांच्याकडे असे प्रकार होत असतील, याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.