महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:27 PM2024-11-05T19:27:26+5:302024-11-05T19:28:11+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्या जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. ५ ते ७ गॅरंटी योजना जाहीर करण्याची शक्यता असतानाच झारखंडमध्येइंडिया आघाडीने सात गॅरंटी देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यामध्ये महिलांना २५०० रुपये, गरीब कुटुंबाला ४५० रुपयांत गॅस सिलिंडर आणि ७ किलो रेशन आदी गोष्टी आहेत.
स्थानिक धोरण आणण्याचे, सरणा धर्म संहिता लागू करण्याचे तसेच प्रादेशिक भाषा आणि संस्कृती जपण्याचा संकल्प करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिलांना डिसेंबर 2024 पासून 2500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. ST-28 टक्के, SC-12 टक्के, OBC 27 टक्के आणि अल्पसंख्याक हितसंरक्षण आणि मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
याचबरोबर प्रतिव्यक्ती 7 किलो रेशनचे वाटप करण्याचे तसेच गरीब कुटुंबाला 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 10 लाख तरुण-तरुणींना नोकरी आणि रोजगार देण्याचे वचन देण्यात आले असून या हमी अंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंतचा कौटुंबिक आरोग्य विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. विविध भागात इंजीनियरिंग, मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठे स्थापन करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. तसेच सर्व जिल्हा मुख्यालयांत ५०० एकरचे ओद्योगिक पट्टे उभारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याचबरोबर शेतकऱ्यांसाठी धान्याला एमएसपी 2400 रुपयांवरून 3200 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच समर्थन मुल्य ५० टक्क्यांनी वाढविण्याचे देखील आश्वासन देण्यात आले आहे.