माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:59 PM2022-05-14T18:59:43+5:302022-05-14T19:00:11+5:30
Manik Saha : माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभा खासदार देखील आहेत.
नवी दिल्ली : त्रिपुरात बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपने माणिक साहा (Manik Saha) यांना नवे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहाच्या नावासह इतरही नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे माणिक साहा आता लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारू शकतात. दरम्यान, माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभा खासदार देखील आहेत.
शनिवारी बिप्लब देब यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर बिप्लब देब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 2023 नंतरही आम्हाला त्रिपुरामध्ये दीर्घकाळ सरकार हवे आहे. त्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे. संघटनेसाठी हे काम मी स्वतः केले आहे. पक्षाने आम्हाला जे काही काम दिले आहे, ते जिथे फिट केले जाईल, ते काम करू, असे बिप्लब देब म्हणाले. यादरम्यान बिप्लब देब यांना नवीन मुख्यमंत्र्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र त्यांनी हे अद्याप माहित नसल्याचे सांगितले. तसेच, हायकमांडच्या सांगण्यावरूनच राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Former Tripura CM Biplab Kumar Deb felicitated Manik Saha, who will be the new Chief Minister of the state pic.twitter.com/yI2NXKyciQ
— ANI (@ANI) May 14, 2022
नव्या मुख्यमंत्रीपदासाठी तीन नावे होती चर्चेत
बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा जोर धरू लागली. यासाठी भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये दिल्लीहून त्रिपुराला गेलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांचा सहभाग होता. यावेळी, त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत तीन नावे समोर आली होती. यामध्ये माणिक साहा यांच्यासह जिष्णू देब वर्मा आणि प्रतिमा भौमिक यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, अखेर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तंब केले.