मणिपूरमधील "त्या" घटनेचा तपास CBI कडे, राज्याबाहेर सुनावणी; सुरक्षेसाठी 35 हजार जवान तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:08 PM2023-07-27T20:08:28+5:302023-07-27T20:08:54+5:30
मणिपूरमधील महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Manipur Violence: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान, 19 जुलै रोजी मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ समोर आला होता. हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले आहे. तसेच, मोबाईलमधून तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला असून, CBI कडे सुपूर्द केला आहे. त्या फोनच्या तपासात अनेक गोष्टी उलगडू शकतात. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी मणिपूरऐवजी आसाममध्ये होईल.
मणिपूरमधील हिंसाचार अद्याप शमलेला नाही, त्यामुळे लष्कर, CRPF आणि CAPF चे 35000 अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा कर्मचार्यांनी मेईतेई वर्चस्व असलेल्या खोऱ्यातील भाग आणि कुकी प्राबल्य असलेल्या डोंगराळ भागांमध्ये एक बफर झोन तयार केला आहे. याशिवाय, भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत मणिपूर-मिझोराम सीमेवर 10 किलोमीटर कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण सीमेवर काटेरी तारा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मणिपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवर दोन्ही देशांतील लोक 40 किलोमीटरपर्यंत मुक्तपणे येऊ शकतात असा करार आहे. अशा परिस्थितीत, म्यानमारमधून आलेला एखादा व्यक्ती अवैधरित्या भारताचा नागरिक बनू नये, यासाठी सरकार बायोमेट्रिक स्कॅन करेल. या अंतर्गत जो कोणी येईल, त्याचे बायोमेट्रिक स्कॅन केले जाईल. हे आधारच्या नोंदीशी जोडले जाईल, जेणेकरून असे लोक भारताचे बनावट नागरिक होऊ शकणार नाहीत. भारत-म्यानमार सीमेवर लवकरात लवकर काटेरी तारा लावण्यात याव्यात, असे आदेश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मणिपूर आणि म्यानमार सीमेवर 10 किमीच्या परिघात कुंपण घालण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, 18 जुलैपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत एकही मृत्यू झालेला नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, जातीय हिंसाचारात आतापर्यंत 150 मृत्यू झाले आहेत. तर 502 जण जखमी झाले आहेत. 6065 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. 361 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 209 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये आतापर्यंत 101 कोटी रुपयांच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.