सहकारी बँकांच्या खात्यांत हेराफेरी
By admin | Published: January 20, 2017 04:26 AM2017-01-20T04:26:38+5:302017-01-20T04:26:38+5:30
नोटाबंदीनंतर सहकारी बँकांतील खात्यांत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करणारे पत्र आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पाठविले आहे
सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर सहकारी बँकांतील खात्यांत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करणारे पत्र आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पाठविले आहे. आयकर विभागाने तयार केलेल्या विश्लेषण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यात पुणे आणि मुंबईतील दोन बँकांची उदाहरणे देण्यात आली आहेत. या बँकांनी कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर देव-घेव केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुण्याच्या एका बँकेने आपल्याकडे जुन्या नोटांत २४२ कोटी रुपये असल्याची माहिती दिली. वास्तविक बँकेकडे फक्त १४१ कोटी रुपयेच होते. याचा अर्थ जुन्या नोटांत आपल्याकडे १0१.७0 कोटींची जास्तीची रक्कम बँकेने २३ डिसेंबर रोजी दाखविली. मुंबईतील बँकेनेही अशाच प्रकारे ११.८९ कोटींची जास्तीची रक्कम आपल्याकडे दाखविली. नोटाबंदीनंतर आयकर विभागाने या दोन्ही बँकांचा सर्व्हे केला होता. त्यात बँकेकडे उपलब्ध असलेल्या नोटा आणि रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेली माहिती यात तफावत आढळून आली. अधिकाऱ्याने सांगितले की, आपल्याकडे जास्तीच्या नोटा असल्याचा अहवाल दिल्यामुळे या बँका ३0 डिसेंबरनंतरही जुन्या नोटा बदलून देऊ शकतात. आयकर विभागाने सहकारी बँकांच्या कामकाजाबाबत यापूर्वीही गंभीर चिंता व्यक्त केली होती. ८ नोव्हेंबर रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. बंद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३0 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती.