रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:19 IST2025-03-22T13:19:17+5:302025-03-22T13:19:51+5:30
संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन
बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी येथे प्रारंभ झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या सभेचे उद्घाटन केले. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी होसबळे यांनी मांडलेल्या वार्षिक अहवालात मणिपूरसह उत्तर-दक्षिण भेद, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आणि महाकुंभची यशस्वी सांगता या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.
संघाच्या कार्याची शताब्दी
यंदाच्या विजयादशमीला संघाच्या कार्याची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने २०२५-२६ शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्याची रूपरेषा या सभेत तयार केली जाणार आहे.
डॉ. मनमोहनसिंग, हुसेन यांना श्रद्धांजली
सह सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी पहिल्या दिवशीचे सत्र पार पडल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना शुक्रवारी प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, प्रीतीश नंदी, एस. एम. कृष्णा, राम जन्मभूमीचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल, तुलसी गौडा, शंकर तत्ववादी आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे सांगितले.
मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारतेय
सहसरकार्यवाह मुकुंद यांनी मणिपूरमध्ये २० महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर वार्षिक अहवालात असलेल्या उल्लेखांवर भाष्य केले. ही स्थिती असली तरी केंद्र सरकार आणि मणिपूरच्या जनतेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कार्यामुळे खूप मोठी आशा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
मातृभाषेतील शिक्षणालाच महत्त्व
भाषेच्या निमित्ताने उत्तर-दक्षिण वाद वाढवण्याचे प्रयत्न राजकारणात होत आहेत. मात्र रा. स्व. संघ प्रादेशिक भाषांनाच महत्त्व देतो. मातृभाषेतील शिक्षणालाच संघाने महत्त्व दिले असल्याचे मुकुंद यांनी नमूद केले.