Manipur: मणिपूरमध्ये पुन्हा भाजप; बीरेन सिंह यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:30 PM2022-03-21T16:30:02+5:302022-03-21T16:31:23+5:30
Manipur: एन बिरेन सिंग यांच्यासह इतर पाच आमदारांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत इतर पक्षांच्या पाठिंब्यानंतर भाजप सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे.
इंफाळ: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग सोमवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. इंफाळमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एन बिरेन सिंह यांची एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. सिंह यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा एक अतिशय चांगला निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार आले आहे, असा विश्वासही व्यक्त केला.
5 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली
एन बिरेन सिंग यांच्याशिवाय नेमचा किपगेन, वाय. खेमचंद सिंग, ठाकूर. बिस्वजित सिंह, अवांगबू न्यूमाई आणि गोविंददास कोन्थौजम या पाच आमदारांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बिरेन सिंग यांची 32 आमदारांसह भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांनी बीरेन सिंग यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते.
Manipur | Five MLAs, including Nemcha Kipgen, Y. Khemchand Singh, Th. Biswajit Singh, Awangbou Newmai, & Govindas Konthoujam swear in as the Cabinet Ministers of the state, in Imphal pic.twitter.com/iuXFi6QW9M
— ANI (@ANI) March 21, 2022
भाजपकडे 41 जणांचे संख्याबळ
राजभवनच्या निवेदनात म्हटले आहे की, जनता दल, दोन राजकीय पक्षांच्या सहा सदस्यांनी, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन सदस्य आणि एक अपक्ष यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्यांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत. यासह, 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे. कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, एन बिरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.
भाजप दुसऱ्यांदा सत्तेत
60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपने 32 जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले. काँग्रेसच्या वाट्याला फक्त पाच जागा आल्या. याशिवाय 7 जागा NPP, 7 NPF आणि 11 जागा इतरांना गेल्या आहेत. 2017 च्या निवडणुकीत, भाजप हा काँग्रेसनंतरचा दुसरा पक्ष होता, तरीही त्यांनी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सदस्यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले आणि एन बीरेन सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसच्या 28 च्या तुलनेत केवळ 21 जागा असूनही 2017 मध्ये भाजपला दोन स्थानिक पक्ष, NPP आणि NPF- सोबत सरकार स्थापन करण्यात यश आले.