मणिपूरचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता; दोन पैकी एक पर्याय निवडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:51 PM2023-06-30T12:51:56+5:302023-06-30T12:52:59+5:30
रविवारी मुख्यमंत्री बिरेन सिंहांनी अमित शहांची भेट घेतली. त्यांच्यासमोर समोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते.
जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळते असलेल्या मणिपूरमधून महत्वाची अपडेट येत आहे. आरक्षणावरून दोन समाजांत सुरु असलेल्या या तणावामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आज राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिरेन सिंह आज दुपारी १ वाजता राज्यपाल अनुसुईया उईके यांच्याकडे राजीनामा सोपविणार आहेत. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला हिंसाचार थांबवू न शकल्याने बिरेन सिंह यांच्यावर टीका होत आहे.
बिरेन सिंहांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. यामध्ये राजीनामा देण्याचा पर्याय देण्यात आला होता किंवा केंद्र हस्तक्षेप करून ताबा घेईल, असे दोन पर्याय होते. परंतू, बिरेन सिंह यांनी राजीनामा देण्याचा पर्याय निवडला असल्याचो सांगण्यात येत आहे.
रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी शनिवारीच गृहमंत्री शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत 18 पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या 40 टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.