Manipur : "हिंसाचाराला चिथावणी देणारे व्हिडिओ व फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार", राज्य सरकारचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:44 IST2023-10-12T14:42:52+5:302023-10-12T14:44:24+5:30
आता राज्य सरकारने हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या व्हिडिओंवर कडक कारवाई केली आहे.

Manipur : "हिंसाचाराला चिथावणी देणारे व्हिडिओ व फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार", राज्य सरकारचा आदेश
मणिपूरमध्ये गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आधी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला. यानंतर दोन मैईते तरुणांना गोळ्या घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता राज्य सरकारने हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या व्हिडिओंवर कडक कारवाई केली आहे.
राज्यात हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान करणारे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जो कोणी अशा व्हिडीओचा प्रचार करेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल झाल्यानंतर हा आदेश आला आहे. अलीकडेच, कुकी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या गटाने दोन मैतई तरुणांना गोळ्या घालून नंतर त्यांना खड्ड्यात पुरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, घटनास्थळ आणि दफनभूमी अद्याप समजू शकलेली नाही.
मणिपूर सरकारच्या गृहविभागाने आदेश जारी करून म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सरकारने हिंसा भडकावणारे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा भडकवणारे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ ठेवू नका. योग्य कारवाईसाठी हे फोटो पोलिस अधीक्षकांकडे सादर करता येतील. या नियमांचे पालन कोणी न केल्यास त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आयपीसी आणि आयटी कायद्यान्वये कारवाई केली जाईल.
राज्यातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणे थांबवावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, दोन बेपत्ता तरुणांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर सप्टेंबरमध्ये इंफाळ खोऱ्यात निदर्शने सुरू झाली होती. आंदोलकांवर सुरक्षा दल आणि पोलिसांच्या कारवाईत १०० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत, ज्यात बहुतांश मुली आहेत.