मणिपूरमध्ये आता लष्कराच्या जेसीओचे अपहरण, शोध मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 07:05 PM2024-03-08T19:05:13+5:302024-03-08T19:05:42+5:30
Army JCO Abducted : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी (८ मार्च) भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (JCO) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले.
Army JCO Abducted : मणिपूर : मणिपूरमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचे घरातून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूर हिंसाचार सुरू झाल्यापासून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, अधिकाऱ्याचे घरातून अपहरण झाल्याची राज्यातील ही चौथी घटना आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी (८ मार्च) भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (JCO) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. समाजकंटकांनी जेसीओचे अपहरण केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोनसम खेडा सिंह असे जेसीओचे नाव असून ते चारंगपत मामंग लिकई येथील रहिवासी आहेत. ते रजेवर असताना सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांचे अपहरण केले. कोनसम खेडा सिंह यांना अज्ञात लोक कारमधून घेऊन गेले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपहरणाचे कारण अद्याप समजले नसले तरी, प्राथमिक तपासात हे खंडणीचे प्रकरण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण त्यांच्या कुटुंबाला यापूर्वीही अशा धमक्या आल्या होत्या. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर जेसीओच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरित्या शोध मोहीम सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग 102 वरून जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे.
मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतरची चौथी घटना
मणिपूरमधील संघर्षाच्या सुरुवातीपासूनची ही चौथी घटना आहे, ज्यात रजेवर असलेल्या किंवा कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये आसाम रेजिमेंटचे माजी सैनिक सेर्टो थांगथांग कोम यांचे खोऱ्यातून अज्ञात सशस्त्र समुहाने अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ते मणिपूरमधील लिमाखॉन्ग येथील डिफेन्स सर्व्हिस कॉर्प्स (DSC) मध्ये तैनात होते.
या घटनेच्या दोन महिन्यांनंतर अज्ञात सशस्त्र समुहाने चार लोकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. एका कारमधून चुराचंदपूरच्या पहाडी जिल्ह्यातून लिमाखोंगला जात असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. हे चौघेही जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्करातील जवानाच्या कुटुंबातील सदस्य होते. तसेच, या कारमधील पाचवा प्रवासी (सैनिकाचे वडील) पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याला लष्कराने उपचारासाठी दिमापूरला नेले. नंतर त्याला आसाममधील गुवाहाटी येथील बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.
याचबरोबर, मणिपूर पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांवर (एएसपी) 27 फेब्रुवारी रोजी इंफाळ शहरातील त्यांच्या घरी हल्ला झाला होता. या प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख अरमबाई तेंगगोल (एटी) अशी झाली. हा एक कट्टरपंथी मैतेई समूहातील आहे.