मणिपूरमध्ये पुन्हा तणाव, मुख्यमंत्र्यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून कुकी समुदाय रस्त्यावर; भाजप नेत्याचं घर जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 08:45 AM2024-09-01T08:45:11+5:302024-09-01T08:45:54+5:30
Manipur : मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण दिसून आले. शनिवारी कुकी-जो समुदायाच्या लोकांनी आदिवासी बहुल भागात तीन रॅली काढल्या. या रॅलींमध्ये कुकी-जो समुदायाने वेगळ्या प्रशासनाची मागणी केली. तसेच, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे.
यादरम्यान, पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता चुरचंदपूरमधील तुइबोंग उपविभागातील पेनिअल गावात भाजपचे प्रवक्ते मायकेल लामजाथांग यांच्या वडिलोपार्जित घराला अज्ञात हल्लेखोरांनी आग लावली. हल्ल्यादरम्यान घराच्या आवारात उभ्या असलेल्या एका कारलाही आग लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एक्सवर लिहिले की, "शांतता रॅलीच्या नावाखाली आपल्या लोकांना (या प्रकरणात थाडू) लक्ष्य करणे, ही एक गंभीर त्रासदायक प्रवृत्ती आहे. अशा चिथावणीखोर कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देऊनही पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल."
कुठे-कुठे काढण्यात आली रॅली?
कुकी-जोच्या वतीने या रॅलींचे आयोजन आदिवासी बहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि तेंगनौपाल जिल्ह्यांतील अनुक्रमे लीशांग, कीथेलमनबी आणि मोरेह येथे करण्यात आले होते. चुराचंदपूरमधील निषेध रॅली लिशांगमधील अँग्लो कुकी वॉर गेटपासून सुरू झाली आणि सुमारे सहा किमीचा प्रवास संपवून तुईबाँग येथील शांती मैदानावर संपली.
कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि झोमी स्टुडंट्स युनियनने पुकारलेल्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कांगपोकपीमध्ये शेकडो आंदोलकांनी कीथेलमन्बी मिलिटरी कॉलनीपासून सुरू झालेल्या रॅलीत भाग घेतला. ही रॅली आठ किमी अंतर कापल्यानंतर थॉमस मैदानावर संपली. स्वतंत्र प्रशासनाच्या मागणीसाठी भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह शहरात निषेध मोर्चाही काढण्यात आला.
दिल्लीतही जोरदार निदर्शने
दुसरीकडे. कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली शनिवारी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार निदर्शने करण्यात आली. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे कुकी समाजाचे लोकही या निदर्शनात सहभागी झाले होते. सर्व आंदोलकांच्या हातात फलक होते, ज्यात मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापलेला होता. हे लोक मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कथित ऑडिओचा निषेध करत आहेत, ज्यामध्ये त्यांनी कुकी समुदायाबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याचे म्हटले आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. बिरेन सिंह हे मैतई समाजाचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या १६ महिन्यांत आमच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत. आमच्या समाजातील महिलांना नग्न करून मारहाण करण्यात आली. आम्हाला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा नको आहे, पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.